चिपळूण-उड्डाणपुलाचा विस्तार वाजवी की अवाजवी
८०७०८
८०७०९
ग्राऊंड रिपोर्ट--------लोगो
उड्डाणपुलाचा विस्तार वाजवी की, अवाजवी
चिपळुणात संघर्षाची तयारी ; २०१४ मध्ये मंजूर प्रस्ताव २०१७ मध्ये रद्द, आता पुन्हा राजकीय पक्ष एकत्र
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः चिपळूण शहरात बहादूर शेख नाक्यापासून युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत उड्डाणपूल आणि त्याच्यापुढे सिमेंट काँक्रिटचा रस्ता असा आराखडा मंजूर झाला. त्यातील रस्त्याचे काम ९० टक्के पूर्णही झाले आहे; मात्र या रस्त्यावर सतत अपघात होत असून, प्रवाशांचे बळीही गेले आहेत. काहीजणं कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. ६ किमीच्या अंतरावर चुकीच्या पद्धतीने जोडरस्ते तयार केल्यामुळे उड्डाणपुलाऐवजी तयार झालेला रस्ता धोकादायक बनला आहे. हे तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन उड्डाणपूल कापसाळपर्यंत वाढवावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे; मात्र या सगळ्यात २०१४ला मंजूर प्रस्तावही चिपळुणातील नागरिक, लोकप्रतिनिधींमुळेच रद्द करावा लागला होता, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. आता पुन्हा उड्डाणपूल कापसाळपर्यंत न्यायचा झाल्यास होणारा खर्च आणि त्यासाठी लागणारी वेळ पाहता २०२६ ऐवजी २०२८ही उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रस्ताव किती वाजवी आणि किती अवाजवी आहे, याची खारतजमा करणे गरजेचे आहे. महामार्गावरील कामे पूर्णत्वास गेल्यामुळे वाढीव उड्डाणपुलाची ही मागणी किती सत्यात उतरेल, हे सांगणे अशक्य आहे.
केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी सुरवातीला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेख नाका ते कापसाळ विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल मंजूर केला होता. शहरातील नागरिकांनी लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून तो बहादूरशेख नाका ते इंग्लिश स्कूलपर्यंत मंजूर करून घेतला. आता पुन्हा युनायटेड इंग्लिश स्कूल ते कापसाळपर्यंत उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. चिपळूण पंचायत समितीपासून कापसाळपर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार झालेला असताना तो तोडून उड्डाणपुलाची मागणी गडकरींकडून मान्य होईल का० याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत.
--------------
पॉइंटर
* उड्डाणपूल वाढवला तर अंतर ६ किमीने वाढेल
* वाढीव अंतरामुळे अंदाजित २२० कोटीचा खर्च अपेक्षित आहे
* सिमेंट काँक्रिटसाठी केलेला सुमारे ५० कोटीचा खर्च वाया जाणार
* तयार केलेला रस्ता तोडण्यासाठी पुन्हा कोट्यवधीचा खर्च
* खर्च वसुलीसाठी सामान्य नागरिकांच्या खिशातून टोल लागण्याची शक्यता
-------------
(टीप- खालील तीन चौकटी एकाखाली एक घ्याव्यात)
२०१४ मध्ये मंजूर होता कापसाळपर्यंत उड्डाणपूल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शहरात २०१४४ मध्ये हाती घेण्यात आले, तेव्हा शहरात चुकीच्या पद्धतीने भूसंपादन झाले होते. त्या वेळी मालमत्तांचे मोठे नुकसान होणार होते. अनेक इमारतीही तुटणार होत्या तसेच जमीनधारकांच्या मोबदल्याचाही प्रश्न होताच. त्यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग कृती समितीची स्थापना केली. माजी आमदार आणि भाजप नेते मधु चव्हाण यांच्या माध्यमातून या समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले. या वेळी उड्डाणपूल करण्याचे ठरले. या बैठकीत बहादूरशेख नाक्यापासून कापसाळपर्यंत उड्डाणपूल बांधणे का आवश्यक आहे आणि तो कसा करावा, या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल मातीच्या भरावाचा न करता तो पिलरवर असावा, असेही ठरल्यानंतर पिलरच्या खालच्या भागाचे सुशोभीकरण राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या खर्चातून करण्याचे नितीन गडकरी यांनी मान्य केले होते.
------------
२०१७ मध्ये उड्डाणपुलाच्या रचनेत बदल
शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाबाबत दोन मतप्रवाह होते. काहींच्या मते, अखंड उड्डाणपूल झाला तर मुंबईतून गोव्याकडे आणि गोव्यातून मुंबईकडे जाणारे पर्यटन शहरात थांबणार नाही. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग आणि शहराच्या व्यापारावर परिणाम होण्याचा धोका होता. अखंड पूल झाला तर बाजारपेठेचे नुकसान होईल आणि चिपळूणचे महत्त्व कमी होईल, या भितीपोटी शहरातील काही नागरिकांनी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या माध्यमातून मंत्री गडकरी यांची भेट घेतली आणि कापसाळपर्यंतचा उड्डाणपूल रद्द करून तो युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत मंजूर करून घेतला. लोकसभेच्या सभापतींनी आक्षेप घेतल्यानंतर गडकरी यांना आपला निर्णय बदलावा लागला; परंतु एकाच शहरातील दोन मतप्रवाहाबाबत गडकरी संतप्त झाले होते.
--------------
२०२५ मध्ये पुन्हा अखंड पुलाची मागणी
सद्यःस्थितीत बहादूरशेख नाक्यापासून युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत उड्डाणपुलासाठी पिलरची उभारणी करण्यात आली आहे. त्यावर गर्डर तयार करण्याचे कामही सुरू आहे. प्रांत कार्यालयासमोर अंडरपासचे काम सुरू आहे. पाग बौद्धवाडीपासून कापसाळपर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार झाला आहे. या दरम्यान पाग पॉवरहाऊस, विश्रामगृहासमोर आणि गुहागर बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरून अंतर्गत भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अपघात होत आहेत. शहराच्या अंतर्गत भागातून महामार्गावर येणाऱ्या वाहनाला महामार्गावरून येणारे वाहन आणि त्याचा वेग समजत नाही. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नाही. हा परिसर अनेकवेळा जाहिरातींच्या फलकामुळे झाकलेला असतो. येथे वाहतूक पोलिस नसतात. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तोडून उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली जात आहे.
------------
चौकट
पादचाऱ्यांनी गजबजलेला परिसर
मुंबईहून गोव्याकडे जाताना उजव्या बाजूला चिपळूण शहराची लोकवस्ती आहे आणि डाव्या बाजूला शैक्षणिक संस्था आणि ८ शासकीय कार्यालये आहेत. शाळा, मुला-मुलींची वसतिगृहे, रुग्णालये, समाजभवन आहेत. ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक, विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांची संख्या मिळून दिवसाला सुमारे सात ते आठ हजार लोक शहरातील रस्ता क्रॉस करतात.
-------
चौकट
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीने उड्डाणपुलाविरोधात पाऊल उचलले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात उड्डाणपुलाचा विषय नक्कीच गाजणार आहे; परंतु त्याचा फायदा आणि तोटा नक्की कोणाला होईल, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. कारण, केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. सार्वजनिक बांधकामखाते भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यास आगामी पालिका निवडणुकीत निश्चितच भाजपला त्याचा फायदा होईल. चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली अखंड उड्डाणपुलासाठी लढा उभा केला जात आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीही श्रेय घेण्यामध्ये मागे राहणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून अखंड उड्डाणपुलासाठी लढा देत आहेत. एकूणच महायुतीतील तिन्ही पक्षांकडून अखंड उड्डाणपुलाचा विषय प्रचारात येण्याची शक्यता आहे.
------------
चौकट
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या
* पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.
* जलवाहिन्या फुटतात
* उड्डाणपुलासाठी चुकीचे भराव
* उड्डाणपुलाच्या प्रस्तावित भिंतीमुळे शहराचे दोन भाग होण्याचा धोका
* चुकीच्या जोडरस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण
--------------
कोट
बहादूरशेख नाका ते कापसाळापर्यंत उड्डाणपूल व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यापासून सकारात्मक होते. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते मधू चव्हाण यांनी सहकार्य केल्यामुळे महामार्ग कृती समितीच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या. चिपळूणसाठी घेतलेले निर्णय नंतर राज्यासाठी लागू झाले. नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट झाली तर हा विषय सोडवणे अवघड नाही.
- राजेश वाजे, अध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग कृती समिती, चिपळूण
-----------
कोट २
चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या विषयावर मी महायुतीच्या शिष्टमंडळाला घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. गडकरी यांच्याकडून चिपळूणवासियांच्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी मी प्रयत्न करेन.
- उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
-------------
कोट ३
चिपळूणमध्ये उड्डाणपूल कापसाळपर्यंत व्हावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. २०२३-२४ मध्ये तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. यावर्षी पुन्हा मागणी आहे. आम्ही प्रस्ताव पाठवून देऊ. लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास त्याला मंजुरी मिळू शकते.
- नजीब मुल्ला, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.