लेख नाना शंकरशेठ
२० (श्री. ईनामदार सर यांना देणे)
25N80941, 25N80942
डोक ः समाजसुधारक नाना शंकरशेठ स्मृतिदिन विशेष...
नाना शंकरशेठ हे मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत प्रवीण होते. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या नानांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर मुंबईच्या समाजसुधारणांसाठी केला. जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या.
- प्रतिनिधी
----
कृतिशील समाजसुधारक...
जगामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांना जन्मतःच लक्ष्मी आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला असतो; पण त्याबरोबर दातृत्व आणि कर्तृत्व यांची जोड असणाऱ्या व्यक्ती फार विरळ. बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि कर्तृत्व या गुणांनी आपल्या पाऊलखुणा अनंत काळासाठी उमटवून या व्यक्ती पुढील अनेक शतके येणाऱ्या पिढीच्या प्रेरणा बनतात. अशाच असामान्य सामाजिक, शैक्षणिक कार्यालय देश पारतंत्र्यात असताना तन-मन-धनाने आयुष्य वेचणाऱ्या, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून आचार्य अत्रे यांनी गौरवलेल्या नाना शंकरशेठ (जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ) यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी दैवज्ञ ब्राह्मण म्हणजेच सोनार समाजात १० फेब्रुवारी १८०३ ला झाला. त्यांचे वडील शंकरशेठ मुर्कुटे हे हिऱ्यांचे व्यापारी होते. ते व्यापारासाठी मुंबईत आले व तेथेच स्थायिक झाले.
नानांचे मातृछत्र त्यांच्या लहानपणीच हरपले तर १८२२ रोजी नानांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांचे शंकरशेठ मुर्कुटे यांचे एकुलते एक अपत्य म्हणून वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी वयाच्या १८व्या वर्षीच नानांवर आली. नाना शंकरशेठ यांनी आपली आई भवानीबाई व वडील शंकरशेठ यांच्या स्मरणार्थ भवानीशंकर मंदिर व एक धर्मशाळा गोविलिया तलावाजवळ बांधली. तिथून त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला.
---
शैक्षणिक कार्य
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना १८२४ : मुंबईचा पहिला गव्हर्नर एलफिन्स्टनला भारतीय लोकांचा विकास व्हावा, असे वाटे. त्या वेळी नाना शंकरशेठ यांनी मुंबई प्रांतातील जनतेलाही शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना केली. या सोसायटीचे अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. या सोसायटीमार्फतच १८२४ ला एलफिस्टन विद्यालय व १८३४ ला एलफिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना करण्यात नानांचा सिंहाचा वाटा होता.
ग्रँट मेडिकल कॉलेज : १८३६ मध्ये विल्यम बेटिंग भारताचा गव्हर्नर जनरल असताना त्याने कलकत्ता येथे स्थापन केलेल्या मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर मुंबईमध्येही असे कॉलेज असावे, असे मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रॅण्ड याला वाटे. त्याचे हे स्वप्न नानांनी पूर्ण केले व त्या कॉलेजला ग्रॅंट यांचे नाव दिले. या मेडिकल कॉलेजमध्ये डिप्लोमाचे शिक्षण दिले जाई. या कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या डिप्लोमाधारकांमध्ये डॉ. भारूदाजी लाड यांचा समावेश होता. लाड यांनी त्या वेळी मेडिकल क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याचे आढळले तसेच या कॉलेजमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन म्हणून स्वतःच्या पैशातून शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली तसेच इंग्रजीतील वैद्यकीय अभ्यास मराठीत अनुवादित करून वैद्यकीय शिक्षण शिकण्यास सुलभ केले.
मुंबईच्या लॉ कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार घेऊन लॉ कॉलेजची स्थापना केली तसेच १८४८ ला दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्टुडण्ड सायंटिफिक अॅन्ड लिटरली’ची स्थापना करण्यात नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक व साहित्यिक दृष्टिकोन विकसित करणे, हा या संस्थेचा उद्देश होता.
बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना : १८५७ ला स्थापन झालेल्या बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्येही नानांचा पुढाकार होता तसेच एलफिन्स्टन कॉलेजचे रूपांतर बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये करण्यामध्ये नानांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांना या युनिव्हर्सिटीचे पहिले मानद सदस्य (फेलो) बनण्याचा बहुमान मिळाला होता. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापनाही नानांनी केली होती. कलेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, हा यामागचा हेतू होता. १८४८ ला स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व ३० हजार रुपयांची देणगीही शाळेला देऊन स्त्रीशिक्षणाचा पाया घातला.
सामाजिक कार्य : मुंबईतील जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी निर्माण केलेल्या म्युनिसिपल कमिशनमध्ये नाना शंकरशेठ सदस्य होते.
सतीची चाल बंद : सतीची चाल बंद करण्यासाठी लोकांच्या सह्या घेण्याचे काम १८२९ ला नानांनी केले. त्यामुळे मुंबई प्रांतात सतीची चाल बंद करण्यामागे नानांचे महत्त्वपूर्ण योगदान होते आणि म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर यांनी नानांना ‘आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री’ असे म्हटले आहे.
पहिली रेल्वे : १६ एप्रिल १८५३ ला फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात रेल्वे सुरू झाली. ही रेल्वे सुरू करण्यातही नानांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. १८४३ पासून रेल्वेचा आराखडा तयार करण्याचे काम चालू होते. त्यासाठी त्या वेळच्या गव्हर्नरने GIPR नानांची संस्था स्थापन केली होती. यामधील जवळपास १० गुंतवणूकदारांपैकी फक्त २ भारतीय होते आणि त्यातीलच एक जमशेदजी जीजीभाई व दुसरे नाना शंकरशेठ. रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेच्या कचेरीसाठी स्वतःच्या वाड्यात नानांनी जागा उपलब्ध करून दिली. रेल्वे सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ज्या चारशेजणांनी प्रवास केला त्यामध्ये रेल्वेत प्रवासी म्हणून पहिला चढण्याचा मान नाना शंकरशेठ यांना मिळाला.
मुंबई कौन्सिलचे सदस्यत्व : १८६१ मध्ये मुंबई कौन्सिलचे सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय होते. मुंबईतील पहिल्या कायदे मंडळाचे पहिले भारतीय सदस्य म्हणजेच त्यांना आमदार म्हणून शकतो. १८३७ मध्ये भिवंडीत झालेल्या दंगलीत दोषी ठरवण्यात आलेल्यांना सोडवण्यासाठी नाना शंकरशेठ यांनी रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नर जनरलकडे पाठपुरावा करून खऱ्या दोषींना शिक्षा करण्यास मदत केली होती. सोनापूर येथील स्मशानभूमी शिवडीला हलविण्याच्या प्रस्तावाला विरोध करून लोकांची होणारी ससेहोलपट थांबवली. त्या काळी ब्रिटिश लोकांनाच ज्युरीत बसवून न्यायदान करण्याचा अधिकार होता. १८३६ मध्ये नानांनी भारतीयांनाही न्यायदान करण्याचे अधिकार असावेत, अशी मागणी ब्रिटिशांकडे केली. नानांचे समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य पाहून ब्रिटिशांनी त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’ (समाजात शांतता निर्माण करणारा राजदूत) ही पदवी बहाल केली.
बॉम्बे असोसिएशनची स्थापना : २६ ऑगस्ट १८५२ रोजी स्थापन झालेली ही राजकीय संघटना होती. याचे संस्थापक अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. ती लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध नव्हती. तिचे स्वरूप गुप्त संघटनेसारखे होते. ही नाना शंकरशेट व त्यांच्या विश्वासातील आजूबाजूच्या लोकांनी स्थापन केली होती. या संस्थेचा उद्देश भारतीय किंवा मुंबई प्रांतातील लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडणे हा होता.
प्रसिद्ध नाटककार विष्णूदास भावे यांना राजाश्रय देऊन नाट्यकला वृद्धिंगत करण्यास मोलाचे योगदान दिले. बादशहा थिएटरचे कर्ज स्वतः फेडून प्रेक्षकांसाठी खुले केले. मुंबईतील म्युझियम, राणीचा बाग आताचे जिजाऊ उद्यान तसेच मुंबईतील विविध बँका यांच्या स्थापनेतही नानांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळेच आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली. मरिनलाईन ते मलबार हिलपर्यंतचा समुद्रकिनारा ज्यांनी मुंबईच्या विकासासाठी हसतहसत दान केला अशा थोर कृतिशील समाजसुधारकाचा मृत्यू ३१ जुलै १८६५ ला झाला...!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.