महावितरणविरोधात ‘भक्तीभाव’ आंदोलन छेडू

महावितरणविरोधात ‘भक्तीभाव’ आंदोलन छेडू

Published on

81054

महावितरणविरोधात ‘भक्तिभाव’ आंदोलन छेडू

रुपेश राऊळ ः स्मार्ट मीटरसह कारभारास जनता कंटाळली, मंत्र्यांचेही दुर्लक्ष


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये महावितरणचा कारभार पाहता जनता पूर्णपणे त्रासली आहे. त्यात स्मार्ट मीटरच्या परिणामांना सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्याचे मंत्री, आमदार, तसेच वीज अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जनतेचे हे प्रश्न सोडवण्यास त्यांना चांगली बुद्धी मिळावी, यासाठी सावंतवाडी महावितरण कार्यालयात १५ ऑगस्टला होणाऱ्या सत्यनारायण महापूजेला ठाकरे शिवसेना महाआरती करून महावितरणच्या विरोधात भक्तिभावाचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिली.
येथील ठाकरे शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊळ बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते. श्री. राऊळ म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महावितरणचा कारभार प्रचंड डगमगलेला आहे. सातत्याने बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढले आहेत. याला जनता पूर्णपणे त्रासली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही हीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यासंदर्भात आढावा घेण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप तरी महावितरणचा कारभार रामभरोसे आहे. जनतेकडून सातत्याने याबाबत आवाज उठवण्यात येत आहे. मात्र, इथल्या राज्यकर्त्यांचे त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे विजेचा त्रास, तर दुसरीकडे स्मार्ट मीटरचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. पाचशे रुपयांचे बिल आठ हजारांवर गेले आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवात विजेचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी वर्गाकडे जिल्ह्यातील राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष असल्याने त्यांना हा प्रश्न सोडवण्याची बुद्धी व्हावी, त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी ठाकरे शिवसेना १ ते १५ ऑगस्ट हा ‘भक्तिभावाचा पंधरावडा’ म्हणून आंदोलन छेडणार आहे. यामध्ये, सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयात १५ ऑगस्टला होणाऱ्या सत्यनारायण महापूजेदिवशी महाआरती करण्यात येणार आहे, तर मळेवाड परिसरातील १५ गावे वेंगुर्ले महावितरण विभागाला जोडली गेली आहेत. जनतेच्या तक्रारी सातत्याने आमच्यापर्यंत येत आहेत. त्यामुळे त्या तक्रारी आणि त्यांच्या मागण्या सोडवण्याची बुद्धी अधिकारी वर्ग आणि इथल्या राज्यकर्त्यांना व्हावी, यासाठी मळेवाड येथील उपकेंद्राच्या ठिकाणी १० ऑगस्टला सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाणार आहे. एकूणच, हा ‘भक्तिभावाचा पंधरवडा’ म्हणून साजरा करणार आहोत. दुसरीकडे, शहर संघटक निशांत तोरसकर यांनीही स्मार्ट मीटरविरोधात घेतलेल्या भूमिकेच्या पुढच्या टप्प्यातील आंदोलनातही सहभागी होणार आहे.’’
-----------------
‘उपरकरांनी भान राखावे’
‘ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांवर बोलताना भान ठेवावे, त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, पक्षवाढीसाठी त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी जरूर आमच्याशी बोलावे, या ठिकाणी ठाकरे शिवसेनाही कोणाच्या इशारावर नाही तर आदेशावर चालते,’ असा सल्लाही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपरकर यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com