मळगाव वाचनालयात मंगळवारी ''काव्यांजली''
मळगाव वाचनालयात
मंगळवारी ‘काव्यांजली’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ः मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून याही वर्षी ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात मंगळवारी (ता. ५) सायंकाळी ४ वाजता ‘काव्यांजली’ या स्वरचित कविता वाचन व गायन कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले आहे.
नवोदित कवींना प्रोत्साहन आणि व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने वाचनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला निश्चितच एक वेगळी उंची प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कवी आणि साहित्यप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी असून, त्यांना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची आणि अनुभवी कवींचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या ‘काव्यांजली’ सोहळ्यात स्थानिक प्रतिभावंत कवींना आपले विचार आणि भावना काव्यात्मक रुपात मांडता येणार आहेत. सर्व साहित्य रसिक, कवी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या काव्यमैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयातर्फे केले आहे.