सिंधुदुर्गात इंजिन तेलाचे संकलन
swt3122.jpg
81262
संदीप डोळकर
समुद्रातील इंजिन तेलाचे संकलन
सिंधुदुर्गात प्रयोगः सागरी पर्यावरण रक्षणासह पुनर्वापरासाठी पाऊल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० : किनारी भागातील मच्छीमारांकडून यांत्रिक नौकांसाठी वापरलेले इंजिन तेल (ऑईल) संकलित करण्यात येत आहे. यातून समुद्री पर्यावरण रक्षणासंदर्भातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिल्हा किनारपट्टीवरून असे सुमारे १ हजार २५० लिटर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करण्यात आले आहे. याला तालुक्यातील गिर्ये बांदेवाडी मच्छीमार विविध सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप डोळकर यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मच्छीमारांकडून सुमारे १ हजार २५० लिटर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करून त्याच्या पुनर्वापरासाठी प्रक्रिया भागीदारांकडे सुपूर्द केले आहे. हा उपक्रम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथील शाश्वत विकास केंद्र, संबंधित ल्युब्रिकेशन्स कंपनी आणि स्थानिक युवक राज तेली यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आला. या उपक्रमाला एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशन यांची आर्थिक मदत लाभली. यापूर्वी थेट समुद्रात फेकले जाणारे हे तेल आता अधिकृत प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानाधारक रिसायकलिंग कंपन्यांकडे पाठविले जाणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच स्थानिक मच्छीमारांना लाभ होणार आहे. यातून स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देणारी यंत्रणा विकसित होईल. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्रुती घाग आणि पूजा साठे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी इंजिन ऑईलमुळे होणार्या सागरी प्रदूषणावर अभ्यास केला आहे. जिल्ह्यातील देवगडसह चार संकलन केंद्रे कार्यान्वित केली आहेत. किनारपट्टीवरील वापरलेल्या इंजिन तेलाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. या उपक्रमाचा पहिला टप्पा नुकताच तालुक्यातील पुरळ येथे एका कार्यक्रमान्वये साजरा करण्यात आला. यावेळी विक्रांत शेळके, प्रवीण हजारे, प्रथमेश हजारे, मुबाशीर पठाण, प्रकल्प समन्वयक नयन घडशी यांच्यासह पुरळ सरपंच अनुश्री तावडे, समीक्षा तेली, गिर्ये बांदेवाडी मच्छीमार विविध सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप डोलकर, दीपक तेली, सुनील तेली, विश्वास घाडी, श्रुती घाग उपस्थित होत्या. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात राबविला जाणारा हा उपक्रम भविष्यात नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि अलिबाग येथेही सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली. हा उपक्रम पर्यावरण रक्षणाबरोबरच स्थानिक युवकांना रोजगार आणि उद्योजकतेची संधी देणारा ठरेल, अशी आशा आहे. अशा प्रकारचे मॉडेल कोकणसह अन्य सागरी भागांमध्ये राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत संदीप डोळकर यांनी व्यक्त केले.
कोट
मच्छीमारी नौकांसाठी वापरलेले इंजिन तेल काहीवेळा मच्छीमारांकडून समुद्रात फेकले जात होते. यातून समुद्री प्रदुषणाबरोबरच मत्स्योत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र, आता असे वापरलेले इंजिन तेल स्थानिक पातळीवर संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. असे संकलित केलेले तेल पुर्नवापरासाठी प्रक्रियेकरिता पाठवले जाणार आहे. यामुळे समुद्री पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.
- संदीप डोळकर, अध्यक्ष, गिर्ये बांदेवाडी (ता.देवगड) मच्छीमार विविध सहकारी सेवा संस्था