हार्मोनल विकारासंदर्भात महिलांनी जागरूक रहावे

हार्मोनल विकारासंदर्भात महिलांनी जागरूक रहावे

Published on

- rat३१p२१.jpg-
P२५N८११७२
सावर्डे : पीसीओडी जाणीवजागृती कार्यशाळेत बोलताना डॉ. अक्षता शेंबेकर व विद्यार्थिनी.

‘हार्मोनल’संदर्भात महिलांनी जागरूक राहावे
डॉ. अक्षता शेंबेकर ः वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे ता. ३१ : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम या हार्मोनल विकारासंदर्भात महिलांनी जागरूक राहून वैद्यकीय उपचार घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन होमिओपॅथिक फिजिशियन आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अक्षता शेंबेकर यांनी केले.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील आयक्युएससी आणि महिला विकास कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय पीसीओडी जाणीवजागृती कार्यशाळेत चुकीची जीवनशैली, तणाव, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहारामुळे या विकाराचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे. ते नियंत्रणात आणण्यासाठी महिलांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक स्वास्थ्य, साधी जीवनपद्धती आणि वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला डॉ. शेंबेकर यांनी दिला. या विकारासंबंधी त्या म्हणाल्या, स्त्रियांच्या अंडाशयात लहान लहान सिस्ट्स (गाठी/पुटकळ्या) तयार होतात. मासिक पाळीचा नियमितपणा बिघडतो. अंडाशयात अंडे पूर्णतः परिपक्व न होता त्याच्या आजूबाजूला सिस्ट तयार होते. महिलांमध्ये मासिक पाळीत अनिश्चितता, वंध्यत्व, शरीरावर अतिरिक्त केस, वजन वाढणे, गर्भाधारणेतील अडचणी, ओटीपोटात वेदना, वाढते ब्लडप्रेशर, झोप न येणं, थकवा, डोकेदुखी आणि अचानक मूडमध्ये बदल यासारख्या समस्या भेडसावतात.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. दीप्ती शेंबेकर यांनी महिला विकास कक्षामार्फत महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. या वेळी प्रा. जयसिंग चवरे यांनी डॉ. अक्षता शेंबेकर यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य टी. वाय. कांबळे, प्रा. सुनील जावीर, प्रा. संकेत कुरणे, प्रा. अवनी कदम, प्रा. पूजा आवले आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती शेंबेकर यांनी केले तर आभार प्रा. पूजा आवले यांनी मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com