महसूप सप्ताह निमीत्ताने मार्गदर्शन, मदत केंद्राची स्थापना
नागरिकांना शासकीय योजनांची माहिती
महसूल सप्ताहाला प्रारंभ ; मदत केंद्र स्थापन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः येथील तहसील कार्यालयातर्फे १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन केले असून, नागरिकांना महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. यासाठी तहसील कार्यालयात मार्गदर्शन व मदतकेंद्र स्थापन करण्यात आले आहे.
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळच्यावेळी पूर्ण करून अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटिसा पाठवणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे आदी कामे करण्याचे निश्चित केले आहे. वेळापत्रकानुसार कामे करून उद्दिष्ट गाठणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे तसेच महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची नागरिकांना माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यासाठीचे उपक्रम राबवण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे हे कार्यक्रम होतील. ३ रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणे, ५ रोजी विशेष साहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे, ६ रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे मुक्त करणे, शर्थभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणांनुसार निर्णय घेणे, ७ रोजी एम स्टॅण्ड धोरणांची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ या पद्धतीने महसूल सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.
----
कोट
महसूल विभागात देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा लाभ घ्यावा.
- प्रवीण लोकरे, तहसीलदार