दहावी, बारावी परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती
परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती
शिक्षण मंडळ ; वैद्यकीय प्रमाणपत्रही ग्राह्य धरले जाते
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विशेष गरजा असलेल्या स्वमग्न प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्ययन शैलीनुसार विविध सवलती मंडळाकडून दिल्या जातात. केंद्र शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी स्वावलंबन प्रमाणपत्र (युनिक डिसॲबिलिटी आयडी कार्ड) निश्चित केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सवलतीसंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. १६ ऑक्टोबर २०१८ च्या शासननिर्णयान्वये सवलती देण्यात येतात. एखाद्या विद्यार्थ्याकडे जर दिव्यांग प्रमाणपत्राऐवजी स्वावलंबन प्रमाणपत्र असेल व त्यांनी ते प्रमाणपत्र विभागीय मंडळ कार्यालयाला दिव्यांग प्रस्तावासोबत सादर केले तर विविध सवलतीकरिता त्या विद्यार्थ्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिस्वाक्षरी असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू नये, असे सर्व विभागीय मंडळांना कळवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळाकडून नियमानुसार विविध सवलती दिल्या जातात. २०२३-२४ पासून याबाबत कार्यवाही करण्यात येत असून, निर्धारित सुविधेपासून कोणताही दिव्यांग विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता मंडळाकडून घेण्यात आली आहे. जरी एखाद्या विद्यार्थ्याकडे स्वावलंबन प्रमाणपत्र नसले तरीही त्याच्याकडे विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळाकडून नियमानुसार विविध सवलती देण्याबाबतची कार्यवाही मंडळाकडून केली जाते. त्यामुळे याबाबत संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी यांनी संभ्रम बाळगू नये, असे मंडळाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे.