
81449
गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी संघटन उभे करा
बाळ माने; कुडाळमध्ये ठाकरे गटातर्फे ‘शिवबंधन परिक्रमा’
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः कोकण आणि शिवसेना यांचे अतूट नाते आहे. गद्दारांमुळे आपली संघटना अडचणीत आली असली तरी तळागाळातील शिवसैनिक आजही ताठ मानेने उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. कोकणातील शिवसेनेचे गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवायचे आहे. त्यासाठी कडवट शिवसैनिकांचे संघटन उभे करा. संघटनेत ज्याठिकाणी पदे रिक्त आहेत, त्या ठिकाणी नेमणुका करा. त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदाऱ्या द्या. लोकसभा आणि विधानसभेत झालेल्या पराभवाला खचून न जाता आणि संकटांना न डगमगता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे मार्गदर्शन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी केले.
येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील शिवबंधन परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. माने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे आदी उपस्थित होते.
माजी आमदार नाईक म्हणाले, ‘‘येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करणे गरजेचे आहे ते केले पाहिजेत. आज शिवसेनेतील अनेकांना वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत. मात्र, तरीही ते पक्षाशी आणि ठाकरेंशी प्रामाणिक राहिले आहेत. त्याचा अभिमान आहे. पुन्हा एकदा त्याच ताकदीने आपल्याला शिवसेना उभी करायची आहे.’’
श्री. उपरकर म्हणाले, ‘‘जरी शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरून नेले असले तरी अजूनही लोक ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मानत आहेत. लोकांची फसवणूक करून सत्ताधारी जिंकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी आतापासून तयारीला लागा. लाडकी बहिण योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर बंद होणार आहे. पालकमंत्री मोठ मोठ्या घोषणा करीत आहेत. मात्र, त्या पूर्ण करीत नाहीत.’’
श्री. पारकर म्हणाले, ‘‘काही कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याने आता नवीन कार्यकर्त्यांना त्यांच्या जागी काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. या संधीचे सोने करा. लोकांची कामे करा, त्यांच्या समस्यांवर आवाज उठवा. त्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही आपल्या पाठीशी आहोत.’’
जिल्हाप्रमुख धुरी म्हणाले, ‘‘येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया. सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत शिवसैनिकांना एकवटून ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवूया आणि शिवसेनेचा भगवा फडकूया.’’ यावेळी श्रेया परब, नीलम पालव, मंदार शिरसाट यांनीही मागदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. सुशांत नाईक यांनी आभार मानले.
----------------
विविध समस्यांनी जनता त्रस्त
महावितरणचे खासगीकरण केले जात आहे. नागरिकांचा विरोध असतानाही खासगी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. त्यामुळे वीज बिल दुप्पट तिप्पट वाढून येत आहेत. महायुती सरकारने उद्योगपतीला आपला महाराष्ट्र विकण्यास सुरुवात केली आहे. सर्व ठिकाणी रस्ते खड्डेमय होत आहेत. शेतकरी विविध योजनांपासून वंचित आहेत. सर्वच बाबतीत महागाई वाढत आहे. गोरगरीब जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. यावर आवाज उठविला पाहिजे, असे यावेळी सतीश सावंत म्हणाले.