
81405
संगमेश्वरातील रस्त्याच्या दुरवस्थेत वाढ
महामार्गाची वाताहात ; वाहनचालक हैराण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ः संगमेश्वर परिसरात दिवसागणिक महामार्गाची वाताहात होताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.
दरवर्षी गणेशोत्सव आला की, अधिकारी, लोकप्रतिनिधींना जाग येते; परंतु त्या आधी वाहनचालक याच खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवतात हे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संगमेश्वरनजीक शास्त्रीपूल ते हातखंबादरम्यानचा पूर्ण रस्ता सध्या पूर्णपणे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. कूर्मगतीने सुरू असलेली कामे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींकडून होणारी डोळेझाक यामुळे सध्या या रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे. गेली १५ वर्षे रखडलेल्या या रस्त्याकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नसल्याने सध्या वेळ नसल्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाणपुलासह संगमेश्वरातील उड्डाणपूलदेखील रखडलेल्या स्थितीत असल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी होते तर येथील स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याकडे तत्काळ लक्ष द्यावे व मुंबई-गोवा महामार्गावर मलमपट्टी न करता महामार्ग प्राधान्याने पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.