
लांजा शहर विकास आराखडा - लोगो
आराखड्यावरून शिवसेना-भाजपमध्ये ‘कलगीतुरा’
महायुतीत मिठाचा खडा; स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीपूर्वीच आराखडा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः शहरातील विकास आराखड्यावरून तालुक्यातील शिवसेना-भाजप महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. लांजा-कुवे बचाव समितीने घेतलेल्या विरोधी भूमिकेबाबत शिंदे शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी आराखडा रद्द करणार नाही, असे ठणकावले आहे. भाजपने समितीच्या बाजूने उभे राहत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याची तयारी केली आहे. त्यांना मंत्री नितेश राणेंनी पाठबळ दिल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला बळ मिळाले आहे; मात्र आराखड्यावरून लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघात शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला लांजा कुवे बचाव समितीने विरोध केला आहे. या आराखड्याला स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी बचाव समितीला दिले आहे; मात्र शिंदे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी हा आराखडा कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला आता राजकीय वळण लागले आहे.
आमदार किरण सामंत हे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांची ताकद त्यांच्यामागे निश्चितच राहणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू असून, या आराखड्याचे नक्की काय होणार याकडे लांजा शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात अनेक त्रुटी आहेत, असे सांगत जाहीर लांजा-कुवे बचाव समितीने त्याला विरोध केला. त्या आराखड्याची अंमलबाजावणी झाली तर शहरातील नागरिकांच्या घरादारावर नांगर फिरवला जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आराखडा लोकांना विश्वासात घेऊन तयार करणे आवश्यक असल्याचे मतही बचाव समितीकडून सांगण्यात आले. आराखड्याविरोधात सुमारे १५०० लोकांनी हरकती घेतल्या आहेत. त्यावर सुनावणीही घेण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती असल्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे. आराखड्यासंदर्भात समितीने आमदार, पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून समितीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लांजा-कुवे बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मत्स्य बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्यापुढे आराखड्याविषयी निवेदन दिले. राणे यांनी या विषयी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले. त्यांच्या दौऱ्यानंतर लांजा तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर आणि पदाधिकारी यांनीही पत्रकार परिषद घेऊन लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले. आराखड्याच्या विरोधात भाजपने उडी घेतल्यामुळे महायुतीमध्येच मतमतांतर असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, याला राजकीय वळण लागल्याचे दिसत आहे.
दरम्यान, लांजा शहरासह आजुबाजूच्या परिसरात तुलनेत विकासकामे झालेलीच नाहीत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा होणे अत्यंत गरजेचे आहे; मात्र विरोधाला विरोध केल्यास विकासाला खीळ बसेल, अशी भूमिका स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत; परंतु सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, भाजपच्या नेत्यांकडून स्वबळाची मागणी केल्याने त्याचे पडसाद भविष्यात ठिकठिकाणी दिसतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
चौकट
चुका सुधारू; पण आराखडा रद्द नाहीः सामंत
सूचना व हरकतींच्या आधारे आराखड्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असे लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सांमत यांनी सांगितले आहे तसेच काही चुका असल्यास त्या दुरूस्त करण्याची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतो; मात्र आराखडा रद्द होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.