‘कास्ट्राईब’च्या सभेत विविध प्रश्नांवर बोट

‘कास्ट्राईब’च्या सभेत विविध प्रश्नांवर बोट

Published on

81494

‘कास्ट्राईब’च्या सभेत विविध प्रश्न चर्चेत

सिंधुदुर्गनगरीत आयोजन; मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकरांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सभेत कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे जुनी पेन्शन प्रस्ताव मंजुरी, नवभारत अभियानासाठी स्वतंत्र खाती काढण्यासाठी सक्ती, देवगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा फरक एनपीएस खाते नसल्यामुळे दिला जात नाही या बाबतीत तात्काळ लक्ष द्यावे. तसेच केंद्रप्रमुख जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पदोन्नतीने ती भरावीत, ऑनलाईन कामकाज, शालेय पोषण आहार व शिक्षकांच्या बीएलओ ऑर्डरी संदर्भात चर्चा केली, अशी माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी शासन निर्देशनानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात कास्ट्राईब महासंघाची
सहविचार सभा घेतली. यावेळी राज्य महासचिव सुरेश तांबे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी आनंद राणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, विठोबा परब आदी उपस्थित होते.
या सभेत डिसेंबर २०२४ पर्यंतचा अनुशेष, पदोन्नती आणि अनुकंपा भरतीबाबत कास्ट्राईब संघटनेतर्फे सद्यस्थिती बाबत माहिती घेतली. तसेच निलंबन प्रकरण, अधिसंक्य पद, तीन डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावण्यांबाबत आढावा मागितला. शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती, रिक्त कर्मचारी भरतीबाबतही कास्ट्राईब संघटनेने प्रश्न उपस्थित केले. संघटनेला सीईओंनी समाधानकारक माहिती दिली. यावेळी खातेनिहाय कास्ट्राईब जिल्हा शाखांनी आपल्या प्रश्नांबाबत विचारणा करुन प्रश्नांची उकल केली.
ग्रामसेवकांची सेवा ज्येष्ठता यादी तालुकानिहाय तयार करावी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देताना त्यांना सर्व विषयांचे सर्वोत्कृष्ट कामाच्या आधारे पुरस्कार द्यावा त्यामध्ये कोणाही संघटनेचा हस्तक्षेप असू नये, असे केल्याने ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. संघटनेतर्फे कोणत्याही खात्यातील कर्मचाऱ्याला एक वर्षापेक्षा जास्त दिवस निलंबन असेल तर त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेत सामावून घ्यावे तसेच किती कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ केले, अशी विचारणा करण्यात आली. यावेळी सीईओंनी विस्तृत माहिती दिली. यावेळी जिल्हा महासचिव किशोर कदम, लक्ष्मण घोटकर, कोकण विभाग सचिव माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंढुरकर, महासचिव अभिजीत जाधव, प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर, महासचिव मनोज अटक, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळस्कर, सचिव प्रशांत जाधव, एम. एस. वंजारे, पर्यवेक्षिका राखी राणे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. किशोर कदम यांनी आभार मानले.
---
इतर प्रश्‍न अन् सीईओंकडून उत्तरे
सप्टेंबर २०२४ मध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे विसर्जित करून ग्रामपंचायत अधिकारी हे एकच पद निर्मिती केल्यानंतर मागील लाभ देऊन त्या वेळेपासून ग्राममध्ये अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष वेतन निश्चिती करावी तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे १०-२०-३० चे प्रस्ताव वेळेत पूर्ण करून द्यावेत. पर्यवेक्षिका कास्ट्राईब संघटनेतर्फे महाराष्ट्र विकास सेवा गट ‘ब’ची पदोन्नती करताना जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकांना निवड सूचीमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी केली असता या बाबतीत प्रक्रिया चालू असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकांना २५ वर्षांत किती वेळा पदोन्नतीने सामावून घेतले? याबाबत खातरजमा करून विस्तार अधिकारी (सां.) प्रमाणे कोटा देऊन मागील अनुशेष भरण्यास कास्ट्राईब पर्यवेक्षिका संघटनेतर्फे विनंती केली.

Marathi News Esakal
www.esakal.com