गावतळे, दाभिळ, उन्हवरे पावनळेत बीएसएनएलचे ''नो नेटवर्क
दाभिळ, उन्हवरे पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’
गैरसोयीमुळे ग्रामस्थ हैराण; काही ग्राहकांचा १५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २ : दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ आदी भागांत भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची सेवा पुरती कोलमडली आहे. गेले दहा दिवस या भागांमध्ये नेटवर्क नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. चांगली सेवा देण्यास कंपनी अपयशी ठरत असल्याने ग्राहकांमध्ये कंपनीच्या कारभाराबाबत प्रचंड संताप आहे. कंपनीने उभारलेले मोबाईल टॉवर फक्त शोभेसाठीच आहेत का?अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून उमटत आहे. काही ग्राहकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील गावतळे हे सर्व सोईसुविधांयुक्त गाव आहे. तेथे गेले १० दिवस बीएसएनएलचे नेटवर्क नाही. तेथे पर्याय नेटवर्क आहे; मात्र दाभिळ, पावनळ, उन्हवरे ही गावे दुर्गम भागात आहेत. अशा ठिकाणी फक्त बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचा ग्राहकांना लाभ घेता येतो; मात्र या गावात गेले अनेक दिवस नेटवर्क नाही. त्यामुळे येथील लोकांना एखाद्या प्रसंगी संपर्क करणे कठीण होत आहे. मोबाईल रिचार्ज फुकट जात आहेत; मात्र तरीही कंपनी हे मोबाईल टॉवर सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. येथील नागरिक वारंवार तक्रारी करूनही कंपनी अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्राहक चांगलेच संतापले आहेत. दुर्गम भाग असल्याने वाहनाच्या सोयीसुविधादेखील कमी आहेत. अशा वेळी एखाद्या नागरिकास वैद्यकीय मदत लागली तर नेटवर्क नसल्याने तीही वेळेत मिळत नाही. पावसाळा आहे त्यामुळे साप, विंचू, नैसर्गिक आपत्ती अशा घटना घडत असतात. अशा वेळी प्रशासनाला संपर्क साधण्यासाठी मोबाईल सेवा कामी येते; परंतु नेटवर्क नसल्याने ही सेवा कुचकामी ठरत आहे.
--------
कोट
मी पाच किलोमीटर चालत आल्यानंतर मला नेटवर्क मिळाले आहे. रत्नागिरीपासून दापोलीपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून झाले. सर्वजण दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहेत. १४ ऑगस्टपर्यंत नेटवर्क न आल्यास मी आत्मदहनाचा इशारा देत आहे.
- जुबेर मोहिमतुले, सामाजिक कार्यकर्ते, दाभिळ
-----
कोट
गावातील ग्रामस्थांच्या भरपूर तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. वारंवार नेटवर्क जात असून, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले.
- ममता शिंदे, माजी सभापती, उपसंघटक शिवसेना असोंड गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.