देवगडला सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत
देवगडला सप्टेंबरमध्ये
राष्ट्रीय लोकअदालत
देवगड ः येथील दिवाणी न्यायालयात १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. येथील तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती यांनी केले आहे. ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारीकडील खटले किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती देवगड या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल, अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहावे किंवा तसे जमत नसल्यास फोनद्वारे या न्यायालयात संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समितीने केले आहे.
------------------
ई-पीक नोंदणीबाबत
शेतकऱ्यांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी शुक्रवारपासून (ता. १) सुरू झाली आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्राच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू केल्याची माहिती डी.डी.ई. तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपचे व्हर्जन ४.०.०. अद्ययावत उपलब्ध केले आहे. खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमणूक केलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. सर्व शेतकऱ्यांनी खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
.......................
शिष्यवृत्तीचा लाभ
घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी एआयआयएमएस, आयआयएम, आयआयआयटी, एनआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकणे यांनी दिली. या योजनेविषयी अधिक माहिती, जाहिरात अर्ज व नियमावली शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करून तो परिपूर्ण भरून कागदपत्रासह ४ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पच, पुणे येथे सादर करावा. पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावयाचे आवाहन श्री. चिकणे यांनी केले आहे.