कोकण
सिंधुदुर्गात आज अवयव दान दिन
सिंधुदुर्गात आज
अवयव दान दिन
ओरोस ः आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत दरवर्षी भारतीय अवयव दान दिन साजरा करण्यात येतो. अवयव दानाविषयी जागरुकता करणे, अवयवदानाशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी नागरिकांना मृत्यूनंतर उपयोग आणि अवयव दान करण्यास प्रेरित करणे, त्याचबरोबर इतर जागृतीपर उपक्रम राबविणे याबाबत केंद्रशासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘अंगदान-जीवन संजीवनी अभियान’ राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून उद्या (ता. ३) पहिल्या मृतदात्याच्या अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ १५ वा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. वेब पोर्टलद्वारे अवयव आणि उती दानासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. खेबुडकर यांनी केले आहे.