चिंदर बाजार आचरा रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था
82038
चिंदर बाजार आचरा रस्त्याची
खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था
अपघाताची शक्यताः डागडुजीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ४ः कणकवली-आचरा या मुख्य रस्त्यावरील चिंदर बाजार ते आचरा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच वाहनचालकांना समजत नाही, अशी दुरवस्था या रस्त्याची झालेली आहे. गेल्या वर्षी चतुर्थीपूर्वी ऑगस्टमध्ये या रस्त्यावरील खड्ड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करून बुजविण्याचे काम केले होते; परंतु ती मलमपट्टी वाहनांच्या वर्दळीमुळे काही दिवसांतच गेली होती.
सध्या या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहेत. विशेष करून दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याचदा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात या परिसरात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तातडीने बुजवावेत. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.