सीडीओई प्रवेशासाठी चार महाविद्यालयांबरोबर करार

सीडीओई प्रवेशासाठी चार महाविद्यालयांबरोबर करार

Published on

सीडीओई प्रवेशासाठी
चार महाविद्यालयांबरोबर करार
मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; दापोली सायन्स महाविद्यालयाचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ : मुंबई विद्यापीठांतर्गत असलेली महाविद्यालये आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (सीडीओई) प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि समस्या विरहित होण्यासाठी विद्यापीठाने जिल्ह्यातील चार महाविद्यालयांशी सामंजस्य करार केला आहे. त्यात दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. लिलाधर बनसोड यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक पद्धतीने पूर्ण करता येत नाही, त्यांच्यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची (पूर्वीचे आयडॉल आता सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तरस्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शिकण्याची सुलभता, परवडण्याजोगे शिक्षण शुल्क, युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ही सीडीओईची वैशिष्ट्ये आहेत.
दापोली अर्बन बँक सायन्स महाविद्यालयाला विद्यार्थी साहाय्यता केंद्राची मान्यता मिळाल्याने त्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना सीडीओईच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुलभता, समुपदेशन, परिचयसत्रे, गृहपाठ, प्रात्यक्षिके आणि प्रकल्प हाती घेणे, सत्र आणि सत्रांत परीक्षा घेणे यासह शैक्षणिक कागदपत्रे, विद्यार्थ्यांना गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे आदी कामे या केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहेत. सीडीओईमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या दुहेरी पदवीसाठी याद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाईल, असे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सांगितले.
---

Marathi News Esakal
www.esakal.com