संक्षिप्त-कर्मचारी पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा
कर्मचारी पतसंस्थेची
रविवारी वार्षिक सभा
कुडाळः सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग या संस्थेची पाचवी वार्षिक अधिमंडळ सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १०) दुपारी ३.१५ वाजता येथील महालक्ष्मी हॉल क्र. २ मध्ये (हॉटेल गुलमोहर नजीक) आयोजित केली आहे. यावेळी सभासदाच्या पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी गौरवही होणार आहे. संस्थेच्या २०२४-२५ च्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाची व दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे, संचालक मंडळाने सुचविलेल्या उपविधी दुरुस्तीस मंजुरी देणे, बाहेरील कर्ज उभारणीची मर्यादा ठरविणे, सभासदांकडून आलेल्या लेखी सूचना/पत्रांबाबत चर्चा करणे, अध्यक्षांच्या संमतीने आयत्यावेळी आलेल्या अन्य विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सुधारित सहकार नियमानुसार सभासदांना दरवर्षी सहकार प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने सभेपूर्वी दुपारी २ ते ३ या वेळेत याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सभेला सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्रीराम चव्हाण, व्यवस्थापक शुभम राऊळ यांनी केले आहे.
....................
‘अरुणा क्लिनिकल’ला
‘आयएसओ’ नामांकन
कुडाळः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ‘आयएसओ’ नामांकन होण्याचा बहुमान कुडाळ हिंदू कॉलनीमधील अरुणा क्लिनिकल लॅबला मिळाल्याची माहिती संचालक रवींद्र परब यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. गेली ३२ वर्षे कुडाळ येथे अरुणा क्लिनिकल लॅबोरेटरी २४ तास सेवा देत आहे. संस्थेने ३२ वर्षांपूर्वी मॅन्युअल पध्दतीने लॅबचे कामकाज सुरू केले. त्यानंतर संपूर्ण लॅब संगणीकृत करण्यात आली. रक्त नमुन्याच्या विविध तपासणी रिपोर्ट संगणीकृत पध्दतीने सुलभ झाले असल्याचे संस्थापक परब यांनी व्यक्त केले. एमएसी अॅडव्हान्स पीजी डीएमएलटी पदवी यशस्वी पूर्ण करून अरुणा क्लिनिकल लॅबची उभारणी कुडाळमध्ये १९९४ मध्ये केली. सध्या या लॅबमध्ये थायरॉईड, कॅन्सर मार्कर यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्यांचे रिपोर्ट काही तासांतच मिळू शकतात. कोकणातील पहिले डायलिसिस परब यांनी कुडाळ येथे २००५ सुरू केले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आयएसओ नामांकन प्राप्त लॅबोरेटरीचा बहुमान अरुणा क्लिनिकल लॅबोरेटरीला मिळाला असल्याचे परब यांनी सांगितले. हा बहुमान मिळाल्याबद्दल अरुणा लॅबचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
..................
पणदूर हायस्कूलतर्फे
समूहगीत स्पर्धा
कुडाळ ः वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर विद्यानगरी (पणदूर तिठा) यांच्या वतीने गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. ११) शालेय जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. लहान गटासाठी (पाचवी ते आठवी) अनुक्रमे २०००, १५०० व १००० रुपये व स्मृतिचिन्ह, मोठ्या गटासाठी (नववी ते बारावी) ३५००, २०००, १५०० व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व विजयी संघांना गौरव प्रमाणपत्र आणि सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. समूहगीत हे देशभक्तीपर सांस्कृतिक, शालेय मूल्यांवर आधारित असणे आवश्यक आहे. एका शाळेकडून एका गटात एकच संघ सहभागी होऊ शकतो. सोबत विद्यार्थी ओळखपत्र किंवा मुख्याध्यापक पत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण होणार आहे. समूहगीत स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी शुल्क ५० रुपये आहे. स्पर्धेची नाव नोंदणीसाठी शनिवारपर्यंत (ता. ९) मुख्याध्यापक संजय गावकर, महेश पाटील, महेश तळगावकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पणदूर हायस्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.