रिक्षा संघटनेमार्फत पेंडूरमध्ये स्वच्छता

रिक्षा संघटनेमार्फत पेंडूरमध्ये स्वच्छता

Published on

रिक्षा संघटनेमार्फत
पेंडूरमध्ये स्वच्छता
मसुरे ः पेंडूर येथील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी मंदिर व परिसराची साफसफाई करण्यात आली. नुकताच सुरू झालेला श्रावणमास तसेच श्रावण महिन्यातील विविध धार्मिक सण व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करता ही स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत अशोक परब, सतीश पाटील, गणेश पेंडूरकर, मंगेश हिंदळेकर, प्रसाद हिंदळेकर, बंटी पवार, प्रशांत लाड, सतीश आळवे, नितीन राऊळ, संतोष परब, शुभम घाडी, कृष्णा वारिक, भाऊ सावंत पटेल, शिवराम सावंत, विकास गावकर, सुनील परब, रामचंद्र सावंत, संदीप सावंत आदी सहभागी झाले. या उपक्रमाबद्दल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी रिक्षा संघटनेचे आभार मानले. संघटनेचे अध्यक्ष अशोक परब यांचा संघटनेच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
.......................
लक्ष्मण गोसावींना
‘कीर्तन अलंकार’
सावंतवाडी ः वेर्ले गावचे सुपुत्र लक्ष्मण गोसावी यांना अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर यांच्या २०२४-२५ या वर्षी झालेल्या कीर्तन दूरस्थ अभ्यासक्रम तृतीय वर्ष अंतिम परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल ‘कीर्तन अलंकार’ ही पदवी प्राप्त झाली. गोसावी हे कीर्तनातून अध्यात्मिक सामाजिक प्रबोधन करीत आहेत. गावात यापूर्वी त्यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली होती. समाजामध्ये असलेल्या परंपरा तसेच रुढी, समाज परिवर्तन या दिशेने त्यांचे कीर्तन समाजाला प्रेरणादायी आहे. कीर्तनाद्वारे समाजातील बदल घडविण्याच्या दृष्टीने केलेला संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. ही पदवी प्राप्त झाल्याने गावागावांत कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
.......................
‘सातार्डा ते मुंबार्डेवाडी
रस्त्याची दुरुस्ती करा’
सावंतवाडी ः सातार्डा-रायाचेपेड-मुंबार्डेवाडी जोडणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साकारलेल्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा मातीचा भराव घालून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी माजी सरपंच राजेंद्र टेमकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. या रस्त्याची उंची वाढविली असून हा रस्ता वळणावळणांचा आहे. गणेशोत्सवात वर्दळ वाढणार असून समोरासमोरून वाहनांना बाजू मिळणार नाही. दुचाकी उभी करून थांबणेही धोक्याचे बनले आहे. जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मातीचा भराव टाकून पिचिंग करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी टेमकर यांनी केली आहे.
......................
गुणवंत विद्यार्थ्यांचा
माजगावात सत्कार
सावंतवाडी ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजगाव क्र. ५ येथे विविध स्पर्धांतील तसेच एसटीएस, बीडीएस स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा शीतल निचम यांचा सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्षा समीक्षा गावडे यांचेही अभिनंदन करण्यात आले. अशोक धुरी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले. अ‍ॅड. पवित्रा धुरी यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com