सावर्डे- गणेशमूर्ती बनवणारी सुनिल चव्हाणांची तिसऱ्या पिढी

सावर्डे- गणेशमूर्ती बनवणारी सुनिल चव्हाणांची तिसऱ्या पिढी

Published on

82246

गणेशमूर्ती बनवणारी सुनील चव्हाण यांची तिसरी पिढी
सावर्डे कुंभारवाडीत कार्यशाळा; महागाईतही कला जपण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ५ : गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायातून तीन महिन्याची मजुरी मिळते. कारखान्यात इतर कामगार ठेवून मूर्तींची संख्या वाढवणे शक्य नसते. त्यासाठी मजुराचे दर व त्यांची काम करण्याचा मर्यादित वेळ लक्षात घेता ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तरीही पारंपरिक व्यवसाय आणि कला जपण्यासाठी सावर्डे कुंभारवाडी येथील सुनील चव्हाण आपल्या कुटुंबासह प्रयत्न करत आहेत. चव्हाण यांची ही तिसरी पिढी आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गावागावातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग शिगेला पोहोचली आहे. रंगकाम, शेवटच्या घडामोडी, डिझाइन फिनिशिंग अशा विविध टप्प्यांवर काम सुरू असून, एकाचवेळी अनेक मूर्ती पूर्ण करण्यासाठी कलाकार रात्रंदिवस झटत आहेत. गणेशमूर्ती तयार करताना प्रत्येक मूर्तीची वैशिष्ट्ये जपण्यावर भर दिला जात आहे. काही मूर्ती पारंपरिक शैलीतील आहेत तर काहींना आधुनिक सजावटीचा स्पर्श दिला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार आकार, उंची, रंगसंगती यामध्ये विविधता ठेवली जात आहे. अनेक मूर्तिकारांनी यंदा पर्यावरणपूरक शाडूमातीपासून मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. छोट्या मूर्तींसह मोठ्या देखाव्यासाठी लागणाऱ्या मूर्तींचीही तयारी जोमात आहे.
शाळा, संस्था, सार्वजनिक मंडळे यांनी आगाऊ बुकिंग केले आहे. सावर्डेत अबू वारे, सावरटकर, चव्हाण यांच्यासह बारा ते पंधरा लहान-मोठ्या गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात शंभर ते पाचशे गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत. पेण येथे तयार केलेल्या गणेशमूर्तीही सावर्डे बाजारपेठेत विक्रीस आल्या आहेत.
या व्यवसायाबाबत कुंभारवाडीतील चव्हाण म्हणाले, हल्ली माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गणेशमूर्तीचे विविध आकार आणि त्याच्या विविध रंगसंगतींकडे लोकांचा कल अधिक आहे. त्यांच्या आवडीनूसार मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्याला येणारा खर्च परवडत नाही. तुलनेत पेण येथील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणून त्यांना रंगसंगती देणे परवडते. प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या गणेशमूर्ती विविध आकाराच्या व आकर्षक असतात. त्यावर रंगसंगतीही उठून दिसते. तसेच शाडूमातीपेक्षा त्या कमी वेळात बनवता येतात. माती, रंग, मजुरी, वाहतूक यांचे दरही वाढलेले आहेत. सध्या ग्राहक टिकवण्याचे आव्हान आहे.

कोट
शाडूमातीच्या मूर्तीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्तींमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. माझ्याकडे शंभरहून अधिक गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या आहेत, तर ३० लहान गणेशमूर्ती शाडूच्या आहेत. हा व्यवसाय आर्थिक फायद्याचा राहिलेला नाही. केवळ आजोबांपासूनची गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा पुढे चालू राहावी म्हणून गणेशमूर्ती बनवत आहोत.
- सुनील चव्हाण, सावर्डे, कुंभारवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com