पुरस्कार
सूळ यांना उत्कृष्ट
कर्मचारी पुरस्कार
पाली ः महसूल दिनानिमित्त जिल्हाप्रशासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पाली येथील ग्राम महसूल अधिकारी शंकर मारुती सूळ यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर शैलेश गुप्ता, कमांडिंग ऑफिसर अमित ग्यानी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. श्री. सूळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, अॅड. सागर पाखरे यांनी अभिनंदन केले आहे.
पाली शाळेची
वर्षा सहल
पाली ः जिल्हापरीषद मराठी शाळा पाली क्र. १ मध्ये मिशन आपुलकी या शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची वर्षा सहल पाथरट नागझरी मंदिर येथे नेण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सांनिध्यात विविध वनस्पतींची माहिती घेतली. मैदानी खेळ खेळले तसेच ओढ्यामध्ये खेळण्याचा आनंदही लुटला. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आणि नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झालेला हर्ष महेश धाडवे याचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे व कुटुंबीयांकडून या सहलीतील भोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापक ममता सावंत, मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, श्रुती वारंग, पालक स्नेहा शिंदे, विनायक राऊत, महेश धाडवे, जान्हवी पांचाळ, जयप्रकाश पांचाळ, वैभवी सावंत, रोशनी सावंत, रंजना पावसकर, आशिकी सावंत उपस्थित होते.
सामंत स्कूलतर्फे
जवानांसाठी राख्या
पाली ः रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले असताना पालीतील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनींनी आपल्या हातांनी राख्या तयार करून त्या भारतीय सैन्यातील जवानांना पाठवल्या. सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील सहशिक्षिका ऋतुजा महाकाळ यांनी मार्गदर्शन केले. निष्ठेने व प्रेमाने तयार केलेल्या राख्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद धाडवे, पोस्टमास्टर सुनीलकुरतडकर व पोस्टमन विजय सुकम यांच्या उपस्थितीत सैनिकांना पाठवण्यात आल्या.