राजापूर - पुर्नवसन वसाहत की कचर्याचे डंपिंग ग्राऊंड
rat5p11.jpg
82241
राजापूरः पुनर्वसन वसाहत भागामध्ये साचलेला कचरा.
पुनर्वसन वसाहत, की कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड
राजापूर कोदवलीतील प्रकार; घंटागाडी बंद केल्याचा फटका
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ः तालुक्यातील कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुनर्वसन वसाहतीत ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पुनर्वसन भागात हॉटेलसह अन्य विविध व्यवसाय थाटलेले असल्यामुळे या परिसरात कचरा वाढलेला आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने हा परिसर बकाल झाला आहे. कचऱ्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत आहे. त्या भागात लोकवस्ती वाढत असून, हॉटेल आणि अन्य दुकानेही थाटलेली आहेत. या भागामध्ये दिवसेंदिवस लोकांची रहदारीही वाढत आहे. तहसीलदार निवास, गॅस एजन्सी व हॉटेल वॉटर येथील वळण या भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. सतत साचणारा कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नसल्याने पुनर्वसन वसाहत म्हणजे कचऱ्यासाठीचे डम्पिंग ग्राऊंडच बनलेले आहे. पुनर्वसन वसाहतीत साचलेला कचरा उचलण्यासाठी कोदवली ग्रामपंचायतीकडून घंटागाडी सुरू केली होती. त्याच्या साह्याने त्या भागातील कचरा उचलला जात होता; मात्र, गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडीही बंद झाली आहे. सध्या ऊन-पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे डेंगी, मलेरीयासारख्या साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच ठिकठिकाणी साचलेसा कचरा तत्काळ उचलावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणीही केली जात आहे.
चौकट
पुनर्वसन वसाहत ग्रामपंचायतीच्या हद्दीत
राजापूर शहरातून वाहणार्या अर्जुना-कोदवली नद्यांना १९८१, १९८३ दरम्यान आलेल्या पुरानंतर पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित केली. पूरग्रस्त म्हणून नोंद झालेल्यांसाठी शहराजवळील कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात आली. त्या वसाहतीमध्ये घर बांधण्यासाठी पूरग्रस्तांना शासनाकडून भूखंड देण्यात आले. ही वसाहत राजापूर शहरातील लोकांची असली तरीही हा भाग कोदवली ग्रामपंचायतीला जोडलेला आहे.
कोट
पुनर्वसन वसाहतमधील कचरा कोदवली ग्रामपंचायतीतर्फे घंटागाडीतून गोळा केला जात होता. गेल्या महिनाभर कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आलेली नाही. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी साचलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. भविष्यात कचरा संकलनाबाबत प्रशासनाने नियोजन करावे. राजापूर शहराच्या प्रवेशद्वारासमोरील भागात होत असलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी.
- देवदत्त वालावलकर, माजी नगरसेवक
चौकट
१५० हून अधिक इमारती
पुनर्वसन वसाहतीची लोकसंख्या ५०० हून अधिक असून सुमारे १५० हून अधिक इमारती आहेत. त्यापैकी काही इमारतींचा वापर निवासासाठी केला जातो. व्यापारी वापरासाठीच्या इमारतींमध्ये हॉटेल, दुकाने आदींचा समावेश आहे. त्या इमारतींचा कर ग्रामपंचायतीकडून आकारला जातो. त्यामधून कोदवली ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.