वृक्ष लागवड
देवराईत १०० वृक्षांची लागवड
चिपळूण ः महसूल दिनाचे औचित्य साधून उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळबंस्ते येथील देवराईत १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. गेले दोन महिने सातत्याने येथे विविध देशी जातीच्या रोपांची लागवड केली जात आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत या देवराईची मुहूर्तमेढ रोवली. सह्याद्री निसर्गमित्रासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या सहकार्यातून देवराईची जोपासना केली जात आहे. आतापर्यंत दीड हजाराहून अधिक झाडे येथे लावण्यात आली आहेत. रोपांचे योग्य संगोपन होण्यासाठी येथे बोअरवेल मारून पाण्याची व्यवस्था केली आहे. ठिबक सिंचनद्वारे रोपांना पाणी दिले जाते. देवराईच्या चारही बाजूने लोखंडी जाळीच्या साह्याने कंपाउंड घेण्यात आले. त्यामुळे मोकाट गुरांपासून लावलेली झाडे वाचणार आहेत. शुक्रवारी महसूल दिनी वृक्षारोपण करताना प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.