बसस्थानकाचे द्वितीय सर्वेक्षण मूल्यांकन
पाली बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे
एसटी आगार ः स्वच्छ सुंदर अभियानांतर्गत द्वितीय सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. 5 ः पाली बसस्थानक हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे व मध्यवर्ती असल्यामुळे तिथे कायमच प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, आवारात पे अँड पार्किंग व सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे या वेळी एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवरील पाली हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, तळकोकण यासोबतच मुंबई विभागातील एसटी बसेस येथे थांबतात. या बसस्थानकाचे नूतनीकरण नुकतेच झाले आहे. या बसस्थानकाचे दुसरे सर्वेक्षण नुकतेच झाले असून, त्यासाठी सिंधुदुर्गचे पथक आले होते. पाली बसस्थानकाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे विभागीय वाहतूक अधीक्षक नीलेश लाड, विभागीय कर्मचारीवर्ग, अधिकारी अमित कळकुटकी यांनी पाहणी करून द्वितीय टप्प्याचे सर्वेक्षण करून मूल्यांकन केले. या वेळी त्यांनी बसस्थानकाचा परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, व्यावसायिक आस्थापना यांची पाहणी करत प्रवाशांशी संवाद साधत मूल्यांकन केले. या सर्वेक्षणासाठी सरपंच विठ्ठल सावंत, अॅड. सागर पाखरे, पोलिस पाटील अमेय वेल्हाळ, गुरुनाथ गराकटे यांनी सर्वेक्षणातील मुद्द्यांनुसार गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय नोंदवले आहेत. या वेळी लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, पाली बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप सावंत, सुनील माळी, प्रवासीमित्र उपस्थित होते.