कंत्राटी शिक्षकांचे चार महिन्याचे मानधन रखडले

कंत्राटी शिक्षकांचे चार महिन्याचे मानधन रखडले

Published on

- rat१०p१२.jpg-
P२५N८३३७७
संगमेश्वर ः येथे झालेल्या बैठकीला उपस्थिती कंत्राटी शिक्षक.

कंत्राटी शिक्षकांचे मानधन रखडले
जिल्हा परिषद ; निवडणुकीपुरतीच केली नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः जिल्ह्यातील डी. एड आणि बी. एड धारकांना स्थानिक शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून संधी देण्यात आली होती. कमी पटाच्या शाळांमधील शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही नियुक्ती केली होती. परंतु त्या शिक्षकांची अवस्था बिकट असून, सेवामुक्त केल्यानंतर कंत्राटी शिक्षकांना त्यांच्या कामाचे मानधन अद्यापही दिलेले नाही.
शासनाच्या निर्णयानुसार ३० एप्रिल रोजी सर्व कंत्राटी शिक्षकांना सेवामुक्त करण्यात आले होते. चार महिन्यांहून अधिक काळ उलटूनही मानधन न मिळाल्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात कंत्राटी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे. अनेक युवकांनी नोकऱ्या सोडून शिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण सरकारने केवळ निवडणुकीपुरतीच नियुक्ती करुन कंत्राटी शिक्षकांची दिशाभूल केल्याचा आरोप संबंधितांकडून होत आहे. कंत्राटी तत्त्वावर काम करूनही आता हातात काहीच नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
कोकणातील अनेक दुर्गम व आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. एका शाळेत केवळ एक किंवा दोन शिक्षकांवर संपूर्ण अभ्यासक्रमाचे ओझे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन इतर भागांत ‘पेसा’ क्षेत्रांत तसेच तिसऱ्या भाषेसाठी कंत्राटी शिक्षक नेमते, मग कोकणातील गरजू शाळांकडे दुर्लक्ष का? असा सवाल आता विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक शिक्षक संघटना व बेरोजगार तरुणांनी कोकणासाठी स्वतंत्र शासन निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षक मिळतील आणि स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार संधी मिळेल अशी सूचना केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com