समर्थ अॅकॅडमीचे कार्य गौरवास्पद
83766
समर्थ अॅकॅडमीचे कार्य गौरवास्पद
डॉ. संजय सावंत ः कुडाळमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः सतरा वर्षांत यशाची परंपरा जोपासणारी समर्थ अॅकॅडमी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहे. संस्थेचे हे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष तथा सुमेध लॅबचे संचालक डॉ. संजय सावंत यांनी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात केले.
येथील समर्थ अॅकॅडमीतर्फे दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संस्थेच्या कार्यालयात डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि समर्थ अॅकॅडमीचे मार्गदर्शक अनंत जामसंडेकर, अॅकॅडमीचे संचालक गजानन कांदळगावकर, गुरुप्रसाद वेंगुर्लेकर, चैतन्य सुकी, प्रसाद परब, गीता बेलवलकर आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, ‘‘अॅकॅडमीने शैक्षणिक क्षेत्रात यशाची कमान गाठली आहे. हीच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मिळालेली शैक्षणिक क्षेत्रातील मोठी पोचपावती आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. समर्थ अॅकॅडमीचे सामाजिक क्षेत्रातही कार्य कौतुकास्पद आहे.’’ श्री. जामसंडेकर यांनी, समर्थ अॅकॅडमीमध्ये शिस्त फार महत्त्वाची आहे. शिस्तीचे अवलोकन करून संस्थेने वाटचाल केली आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची आहे. पालक आणि शिक्षक यांतून विद्यार्थी घडत होत असतो. या त्रिवेणी संगमासाठी या तिन्ही घटकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे सांगितले. विद्यार्थिनी निधी सावंत हिने गुरुचे महत्त्व सांगितले. पालक सलोनी तेली यांनी संस्थेचे कौतुक केले. चैतन्य सुकी यांनी सूत्रसंचालन केले. साईप्रसाद वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.
.....................
गौरव गुणवंतांचा
दहावी परीक्षेतील स्मितेश कडुलकर, निधी सावंत, रिया पाटणकर, गायत्री शिंदे, प्रथम सावंत, शुभम पिंगुळकर, यशराज खानोलकर, गणेश दरवडा, नीरज पाटकर, दिव्या राऊळ, आर्या आव्हाड, मनस्वी नाईक, मैथिली गावडे, श्रेयस चव्हाण, वरद प्रभू, अजिंक्य आडसरे, वेदांत रोहिले, श्रावणी धामापूरकर, आस्था बिड्ये, बारावी परीक्षेतील मनस्वी मर्गज, रुचिरा चव्हाण, केतकी साळवी, तृप्ती गावडे, सलोनी तेली, तन्वी आरेकर, आठवी प्राविण्य प्रज्ञा परीक्षेसाठी नील कांदळगावकर, आठवी शिष्यवृत्ती रुशील धुरी, मनस्वी झेंडे, नील कांदळगावकर या गुणवंतांना गौरविले.