सात प्रवाहांचा स्वामी तो सप्तेश्वर
श्रावण सोमवार विशेष---लोगो
-rat१०p२४.jpg-
२५N८३४५०
संगमेश्वर ः सप्तेश्वर मंदिर आणि कुंड
-rat१०p२५.jpg-
२५N८३४५१
मंदिराच्या भिंती
-rat१०p२६.jpg-
P२५N८३४५२
मंदिरात जाण्यासाठी कमान
----
श्रावण विशेष-------लोगो
सात प्रवाहांचा ‘स्वामी तो सप्तेश्वर’
प्राचीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना ; अलकनंदा नदीचे उगमस्थान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध सप्तेश्वर मंदिर प्राचीन जल व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणून ओळखलं जाते. मुळ्ये रुग्णालयासमोरून ३ किलोमीटर अंतरावर गर्द झाडीत सप्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे. कसबा गावात वाहत जाणाऱ्या अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याखाली येणारे पाणी सात प्रवाहात विभागून पुन्हा मोठ्या कुंडात सोडले जाते. त्यामुळे याला सात प्रवाहांचा स्वामी म्हणून ‘सप्तेश्वर’ अशी ओळखले जाऊ लागले. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केले आहे.
सप्तेश्वर मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर समोर एक पाण्याचे कुंड आहे. त्याच्यामागे अजून दुसरे कुंड आणि त्यामागे चिऱ्याच्या दगडात बांधलेले हे मंदिर नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. त्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे. पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट पद्धतीने आणलं आहे. प्रत्येक खिडकी जवळ उभा आडवा छेद देणारे बांधकाम करून त्यातून पाणी प्रवाहित केलेलं आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत.
मध्ययुगीन काळात मंदिरातील जलव्यवस्थापन केले असावे असा अंदाज आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्यावर एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. या सातही विभागातून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठ्या कुंडात पडतात. कुंडात आत उतरायला पायऱ्या आहेत. स्वच्छ पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते. ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढ्याला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे कसबा गावात जातो.
सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते.
चौकट
श्रावणात मुंबईहून येणाऱ्यांची गर्दी
निसर्गाचा वरदहस्त लाभलेले नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना पहायला असंख्य पर्यटक आणि स्थानिक मंडळी येत असतात. श्रावण महिन्यात येथे दर सोमवारी भक्तगणांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यात मुंबईहून येणाऱ्या भक्तगणांची संख्या मोठी असते.