स्वरनिनादतर्फे आज सादर होणार
‘स्वरनिनाद’तर्फे आज सादर
होणार विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
रत्नागिरी, ता. १० : स्वरनिनाद संगीत विद्यालयातर्फे सोमवारी (ता. ११) गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात १९० विद्यार्थी कलाविष्कार सादर करणार आहेत. कार्यक्रमात विद्यार्थी संवादिनी, बासरी, तबला, पखवाज वादन करणार आहेत. स्वा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ४ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
गेली ८० वर्षे अविरतपणे स्वरनिनाद संगीत विद्यालय कार्यरत आहे. रत्नागिरीत सांगीतिक चळवळ सुरू करण्यात (कै.) विनायकबुवा रानडे, (कै.) भालचंद्रबुवा रानडे आणि (कै.) बाळासाहेब हिरेमठ यांचे मोलाचे योगदान आहे. विनायकबुवा आणि भालचंद्रबुवा यांनी ८० वर्षांपूर्वी संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रम केला जातो. सध्या स्वरनिनाद संगीत विद्यालयाचे वर्ग माळनाका आणि झाडगाव येथे सुरू आहेत. यात सुमारे २५० विद्यार्थी तबला, संवादिनी, पखवाज, बासरीचे शास्त्रीय शिक्षण घेत आहेत. त्यांना संगीत विशारद, शिक्षक विजय रानडे, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, प्रज्ञा काळे, प्रसन्न जोशी संगीताचे शिक्षण देत आहेत. या कार्यक्रमाला संवादिनीवादक अनंत जोशी, ऑर्गनवादक विलास हर्षे, तबलावादक हेरंब जोगळेकर, ॲड. राजशेखर मलुष्टे, आकाशवाणीच्या निवेदिका निशा काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संगीत प्रेमींनी कलाविष्कारांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वरनिनाद संगीत विद्यालयाचे प्रमुख विजय रानडे यांनी केले आहे.