बाबुराव जोशी ग्रंथालयात पुस्तक पेढी योजना
-rat१०p१६.jpg-
P२५N८३४३२
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर.
-----
डॉ. रंगनाथन यांच्यामुळे
ग्रंथालय चळवळ समृद्ध
डॉ. साखळकर ः जोशी ग्रंथालयात पुस्तक पेढी योजना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आणि मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रात पाच सूत्रे सांगितली. पुस्तके ही सजीव असून ती उपयोगासाठी आहेत, वाचकाला त्याच्या आवडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे, वाचकाचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे; या पंचसूत्रीमुळे वाचन चळवळ पुढे जात आहे, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात पुस्तक पेढी योजनेअंतर्गत पुस्तक संच वितरण, वाचक गटाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तकपेढीचा उपयोग मागासवर्गीय, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना होत आहे. पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. या वेळी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, ग्रंथालय समितीच्या समन्वयक आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते. लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वर्षभर वापरण्यासाठी त्यांनी निवड केलेल्या पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. सेजल मेस्त्री हिने पुस्तक पेढीमार्फत वर्षभर अभ्यासासाठी पुस्तके मिळणे ही ग्रंथालयाची खूप महत्त्वाची सेवा आहे व माझ्यासारखे विद्यार्थी या सुविधेचा कायम लाभ घेत आहेत; असे मत व्यक्त केले. जान्हवी जोशी हिने सांगितले की, अभ्यासाव्यतिरिक्त एक जादा पुस्तक किंवा नियतकालिक घेता येणे ही एक महत्त्वाची सुविधा ग्रंथालयाचा वाचक गट आम्हाला देत आहे. या उपक्रमात विद्यार्थी सहभाग सतत वाढत आहे.