गोवळ गावाचा आदर्श: मोबाईलवर लगाम, संस्कारांना गती

गोवळ गावाचा आदर्श: मोबाईलवर लगाम, संस्कारांना गती

Published on

दखल........लोगो

इंट्रो

राजापूर तालुक्यातील गोवळ गावचे कौतुक करायला हवे. या गावाने स्वतःहून काही स्तुत्य निर्णय घेतले आहेत. मुलांना अठरा वर्षांनंतरच मोबाईल हाती द्यायचा हा एक महत्त्वाचा निर्णय. गावाने असा प्रयत्न करायचा, असा चंग बांधून तसा ठरावही केला हे महत्त्वाचे. इंग्रजीमध्ये कधीही उशीर होत नसतो अशा आशयाची म्हण आहे ती महत्त्वाची अशासाठी की, आता उशीर झाला उपयोग काय? या आधी सुरू करायला पाहिजे होते म्हणजे येथे असे की, मुलांच्या हाती आधीच मोबाईल दिला आहे, आता काय करायचे...? असा रडका सूर लावला जाण्याची शक्यता आहे; मात्र हा निर्णय अंमलात आणताना काही मुलांच्या हाती या आधी दिलेले मोबाईल काढून घेतले गेले, तर ते अभिनंदनीय ठरेल.
- शिरीष दामले, रत्नागिरी

--
गोवळ गावाचा आदर्श ः मोबाईलवर लगाम, संस्कारांना गती

गोवळ गावाने मोबाईलबाबतच्या निर्णयासह सायंकाळी सहा ते आठ यावेळी दूरदर्शन संच बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामपंचायतकडून दाखले घेत असताना एक पुस्तक भेट द्या, अशी एक कल्पना मांडण्यात आली आहे. याशिवाय आपल्या जागेत एखादे झाड ग्रामपंचायतीच्या दाखल्याच्या बदल्यात लावावे, अशीही अपेक्षा आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी पावसाचे पाणी साठवणे, हे गावात जुन्या-नव्या घरांना बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शौचखड्डा बंधनकारक केला आहे. या साऱ्या निर्णयाबाबत ग्रामपंचायतीचेच नव्हे, तर साऱ्या गावाचे अभिनंदन. हे निर्णय अमलात आणताना अडचणी येणारच आहेत; परंतु गावानेच पुढाकार घेतल्यानंतर मानसिकतेत बदल होऊ शकतो. गावातील दूरदर्शन संच मुलांच्या अभ्यासाच्या वेळेस बंद करण्याचा प्रयोग एका गावाने यशस्वी केला आहे. म्हणजे अशा निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. अशा निर्णयाचे फायदे कळले की, मग इतरही त्यात सामील होतात किंवा विरोध करणारी मंडळीही आपला विरोध सोडून देतात. मोबाईलचा निर्णय अमलात आणणे कठीणच आहे; परंतु याबाबतची सामूहिक जाणीव झाली आहे आणि त्यामुळे मोबाईलच्या वापरावर बंधन येऊ शकते. मुले त्यापासून दूर राहण्यासाठी स्वतः पालक मोबाईलपासून दूर राहण्याची गरज आहे. पालकांनी मुलांना मोबाईल हाती देऊ नये, असा टोकाचा आग्रह गोवळ गावचा नाही; मात्र अठरा वर्षांच्या आतील मुलाला व्यक्‍तिगत मोबाईल देऊ नये, असा निर्णय आहे.
दाखले देताना पुस्तक भेट देण्याची कल्पना निश्चितच चांगली आहे; मात्र ती फक्त प्रतिकात्मक असू नये. कोणती पुस्तकं दिली गेली पाहिजेत, ती वाचणारी मंडळी कोण, ही पुस्तकं वाचली जाणार का? कशी वाचली जाणार, याचाही विचार केला पाहिजे. ग्रामपंचायतीतून दरवर्षी किती दाखले दिले जातात, याचा गावात अंदाज येऊ शकतो. त्याच्या बदल्यात झाडे किती लावली, हेही वर्षभरात कळू शकेल; मात्र झाडे लावताना ती कोणती लावली आणि त्यातील किती जगवली, याचेही भान राखले गेले पाहिजे. गोवळ गावाला शुभेच्छा. एक वर्षानंतर यश किती मिळाले याचाही आढावा घेऊ.

चौकट
...हा गाव घ्या दत्तक!
महाविद्यालयातील एनएसएस विभाग काही गावे दत्तक घेतात. काही संस्थांही त्यांच्या कामासाठी गावे दत्तक घेतात. राजापूर तालुक्यातील महाविद्यालयांनी गोवळ गावाने घेतलेल्या निर्णयाची अधिक चांगल्यारितीने अंमलबजावणी करण्यासाठी हा गाव दत्तक घ्यायला हरकत नाही. आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे या संवेदनशील अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी या गावावर लक्ष ठेवून या गावचे निर्णय प्रत्यक्षात उतरतील, यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या काही सरकारी योजना किंवा कार्यक्रम या गावात राबवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com