माजगाव दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
माजगाव दत्त मंदिरात
विविध धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी, ता. ११ ः तालुक्यातील माजगाव येथील श्री दत्त मंदिरात श्रावण महिन्यातील दर गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम व भजनांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दत्त मंदिर नव्याने बांधण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या नियोजित दत्त मंदिराच्या प्रारूप आराखडा प्रतिकृतीचे अनावरण नुकतेच केले. मंदिराच्या मदतीसाठी भाविकांनी व दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावर्षीपासून नियोजित मंदिराचे बांधकाम हाती घेण्याबाबत श्री दत्त मंदिर देवस्थान कमिटी पुढाकार घेत आहे. श्रावण महिन्यातील पुढील दोन गुरुवारी आरती, महाप्रसाद व भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर देवस्थान कमिटीने केले आहे.
ठाकरे गट कार्यालयाचा
वैभववाडीत आज प्रारंभ
वैभववाडी, ता. ११ ः ठाकरे शिवसेनेच्या वैभववाडी तालुका शाखा कार्यालयाचा प्रारंभ उद्या (ता. १२) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते बाळ माने, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके व युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना
दोडामार्गात रक्षाबंधन
दोडामार्ग, ता. ११ ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दोडामार्ग शाखेतर्फे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व अन्य कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचा सेवाभाव व त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बहिणींनी ‘आरोग्यसेवा हीच खरी सेवा’ हा संदेश देत आजारपणात आणि आपत्कालीनप्रसंगी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. मिठाईचे वाटप करून सणाचा गोडवा वाढविण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच समाजातील विविध क्षेत्रांतील सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी असे उपक्रम राबवत असते.
राधारंग फाउंडेशनतर्फे
शिष्यवृत्तीचे वितरण
झाराप, ता. ११ ः वालावल-कुडाळ येथील नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालयातील चार विद्यार्थ्यांना ‘राधारंग’ फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीचे धनादेश विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून राधारंग फाउंडेशनच्या सदस्या अरुणा सामंत, श्रीपाद देसाई उपस्थित होते. वालावल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलेले गोविंद आंबेकर व सुमती गोविंद आंबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या बंगळूरस्थित कन्या पुष्पा चित्तल यांनी ‘राधारंग’कडे ठेव ठेवली आहे. या ठेवीतून सातवी, आठवी, नववीमधून प्रथम क्रमांक मिळविलेले अनुक्रमे अनुष्का कोचरेकर, जयेश राऊळ व अथर्व मठकर यांना प्रत्येकी सतराशे रुपयांचा धनादेश दिला. किशोर पांडुरंग सरनाईक यांच्या स्मरणार्थ सरनाईक परिवाराकडून होतकरू विद्यार्थी म्हणून कौस्तुभ चव्हाण याला दोन हजारांचा धनादेश देण्यात आला. संतोष गोसावी, विशाल कदम, प्रियंका मयेकर आदी उपस्थित होते. भाग्यविधाता वारंग यांनी प्रास्ताविक, तर मुख्याध्यापक नारायण कोठावळे यांनी आभार मानले.
जिल्हा ग्रंथालयामध्ये
आज पुस्तक प्रदर्शन
कुडाळ, ता. ११ ः भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त येथील राव बहाद्दूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) येथे उद्या (ता. १२) सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत वाचनालयाने खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ही पुस्तके सभासदांना बुधवारपासून (ता. १३) वाचायला दिली जाणार आहेत. वाचकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.