रानफुलांच्या सौंदर्याने कोकणातील कातळ बहरले
- rat१२p६.jpg-
P२५N८३८५२
संगमेश्वर ः देवरूख येथे कातळावर उगवलेली रानफुले. (छाया : प्रतीक मोरे , देवरूख )
---
रानफुलांच्या सौंदर्याने कोकणातील कातळ बहरले
निसर्ग अभ्यासकांना पर्वणी; असंख्य फुलांचे नामकरणच नाही
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः श्रावण महिन्यात कातळावर निसर्गदेवतेकडून फुलवली जाणारी रंगीबेरंगी फुलांची बाग मानवी हातांना आव्हानात्मक आहे. श्रावण महिन्यात सुरू होणारा रानफुलांचा हंगाम पुढे अश्विन महिन्यापर्यंत कायम असतो. हे तीन मराठी महिने हिंदू संस्कृतीत व्रतवैकल्ये आणि विविध सणांचे म्हणून ओळखले जातात.
श्रावणात सुरू असणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळामुळे पडणारे इंद्रधनुष्य, त्याच्या जोडीने डोंगररांगांमधून दाटून येणारे दाट धुके त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन, अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीत सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्रकिनारपट्टीच्या विविध भागातील कातळ परिसर विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी खुलला आहे. एरवी काळा तुळतुळीत, काहीसा भेसूर आणि कोरडा दिसणारा कातळ परिसर सध्या आकर्षक फुलांनी श्रावणसरींमध्ये असा काही खुलून गेला आहे की, पाहणाऱ्यांच्या नजरेचे पारणे फिटावे असे चित्र सर्वत्र आहे. कातळावरील डबकी आणि परिसरामध्ये सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपट्यांवर फुललेल्या फुलांनी खुललेले निसर्गसौंदर्य मनात साठवण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळलेली आहेत.
ऊन-पावसाच्या खेळासोबत श्रावण महिन्यात कोकणचे निसर्गसौंदर्य नटलेले आहे. ठिकठिकाणी उंचावून कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल नजरेचे पारणे फेडते. गेल्या काही दिवसांपासून कातळपरिसर रंगीबेरंगी फुलांनी साजशृंगार केल्यासारखा सजलेला आहे. निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगाच्या या फुलांचे सौंदर्यही चांगले खुलले आहे. कोकणच्या माळरानांवर फुलणारी ही रानफुले म्हणजे निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांना एक सुवर्णसंधीच आहे. त्यातील असंख्य फुलांचे अजूनही नामकरण झालेले नाही.
चौकट
बहरलेली रानफुले
कोकणच्या माळरानावर सध्या सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी, सोनवेल, कर्टूल, सोनतळ, शेरवड, कुडा, कोरंटी, गायरी, गोविळ, गांधारी, कोंडानी, भेंद्री, हळुदा, तेरडा, दूधवेल, नावळी, हरणतोंडी, कळलावी, रानहळद, कवळा, घाणेरी, रानमोडी, कोसमोस, कारवी (ही ९ वर्षातून एकदा फुलते.) डिकेमाळी, टोपली, सोनकी, गवळण, कुमुदिनी, गंधारी, अग्निशिखा यांसह अनेक प्रकारची रानफुले बहरलेली पाहायला मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.