नाग्या महादू वसतिगृहास मदतीचा हात

नाग्या महादू वसतिगृहास मदतीचा हात

Published on

83919

नाग्या महादू वसतिगृहास मदतीचा हात

निवृत्त शिक्षकांचा पुढाकार; आदिवासी दिनानिमित्त ५५ हजारांचा धनादेश

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक, शाखा मालवणतर्फे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाचे औचित्य साधून मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांनी पुढाकार घेऊन मालवण तालुक्यातील निवृत्त प्राथमिक शिक्षकांकडून, तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ५५ हजार रुपये संकलन करत वेताळबांबर्डे (ता. कुडाळ) येथील नाग्या महादू कातकरी निवासी वसतिगृहाचे संस्थापक उदय अहिर यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी वसतिगृहातील मुलांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वसतिगृहातील मुलींनी मान्यवरांना राख्या बांधल्या. विजय चौकेकर यांनी आपला वाढदिवसही आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित राहून या मुलांच्या सहवासात केक कापून साजरा केला. चौकेकर यांनी वाढदिवसानिमित्त पाच हजारांचा धनादेश उदय अहिर यांना दिला.
यापूर्वी या वसतिगृहांत प्रत्यक्ष जाऊन चौकेकर यांनी अहिर यांच्याकडून तेथील परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर ही परिस्थिती मालवण तालुक्यातील निवृत्त शिक्षकांच्या समोर मांडली होती. यावेळी अनेक निवृत्त शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये देणगी गोळा केली होती. पंडित माने, काशिनाथ कलंबिसकर, कोमल कदम, अक्षय कदम यांनीही यासाठी मदत केली. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्गच्या सदस्यांनीही मदत जमा केली. या देणगीची एकत्रित रकमेचे ५५ हजारांचा धनादेश अहिर यांच्याकडे सुपूर्द केला गेला.
यावेळी निवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक संतोष कदम यांनीही वसतिगृहाला आर्थिक मदत केली. यावेळी निवृत्त शिक्षक कृष्णा पाताडे, रावजी तावडे, संतोष कदम, माध्यमिक शिक्षक पंडित माने, पोस्टमास्तर काशिनाथ कलंबिसकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे, जिल्हा युवा संघटक युगांत चव्हाण, दिलीप चव्हाण, अक्षय कदम, सुमन कदम, विशाखा चौकेकर, वैभव चौकेकर आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com