चिवेली व्यायामशाळा बांधकाम प्रकरणी फेरचौकशी

चिवेली व्यायामशाळा बांधकाम प्रकरणी फेरचौकशी

Published on

‘चिवेली व्यायामशाळे’ची फेरचौकशी
क्रीडा संचालकांचे आदेश ; १२ लाख वसूल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः तालुक्यातील चिवेली येथील व्यायामशाळा बांधकामप्रकरणी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संचालकांनी कोल्हापूर विभागीय उपसंचालकांना फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व संबंधित तत्कालीन संस्था सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातील चिवेली येथे २०१४-१५ मध्ये आदर्श विद्यामंदिर चिवेली यांना व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायामशाळा इमारत बांधकामास ७ लाखांचे अनुदान मंजूर झाले होते. ते अनुदान संस्थेला वितरितदेखील करण्यात आले होते; मात्र प्रस्तावानुसार त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यायामशाळेचे बांधकाम झाले नाही याशिवाय त्याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने चौकशीत निदर्शनास आले होते. त्यामुळे या अनुदानाचा अपहार केल्याचा ठपका तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी ठेवला होता. त्यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडून योग्य ती फौजदारी कारवाई न होता व्याजासह रक्कम वसूल केल्याचे आढळून आले. यामध्ये संबंधितांनी व्याजासह १२ लाखांची रक्कम जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे जमा केली; मात्र या अपहाराबाबत कोणावरही फौजदारी कारवाई झाली नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांकडे केली होती.
याची माहिती देताना साळुंखे म्हणाले, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहसंचालकांनी चिवेली येथील व्यायामशाळा इमारत बांधकामाप्रकरणी फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा चौकशी अहवाल आठवड्यात सादर करण्याचे आदेश कोल्हापूर विभागीय उपसंचालकांना दिले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com