चुकीच्या कामांबाबत जाब विचारणार
84292
चुकीच्या कामांबाबत जाब विचारणार
ठाकरे शिवसेनेचा ठरावः वेंगुर्लेतील सभेत विविध समस्यांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ः शहरातील चुकीच्या विकासकामांबाबत जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी यांची भेट घेण्याचे तसेच गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज विभागाला निवदेन देण्याचे ठाकरे शिवसेनेच्या मंगळवारी (ता. १२) झालेल्या सभेत ठरविण्यात आले.
वेंगुर्ले तालुका ठाकरे शिवसेनेची मासिक सभा काल सुंदर भाटले येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात झाली. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, महिला उपजिल्हा प्रमुख सुकन्या नरसुले, महिला तालुका प्रमुख साक्षी चमणकर, माजी नगरसेवक तुषार सापळे, कोमल सरमळकर, अरुणा माडये, रिया राऊत, सुधाकर राणे, अजित चमणकर, स्वरा आडेलकर, दिक्षा नार्वेकर, मनोहर येरम, संदीप केळजी आदी उपस्थित होते.
वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे तालुक्यातील जनता हैराण झाली आहे. त्यातच गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे. या सणात वीजपुरवठा सुरळीत रहाण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत येणाऱ्या चाकरमान्यांना होणारा त्रास, वारंवार होणारी वाहतूक कोंडी याबाबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.
निशाण तलाव परिसरामध्ये असलेले गोडबोले गेट बंद केल्यामुळे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाई समस्येबाबत नगरपरिषदेचे लक्ष वेधले जाणार आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कोरकमिटी निवडण्यात आली असून यामध्ये अजित राऊळ, तुषार सापळे, संदेश निकम, संदीप केळजी, शैलेश परुळेकर, अस्मिता राऊळ, सुमन निकम, कोमल सरमळकर, अरुणा माडये, दिव्या नार्वेकर, रिया राऊत यांचा समावेश करण्यात आला. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तालुका प्रमुख व पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा घेऊन प्रभागामधील समस्या आणि जनतेच्या तक्रारी जाणून घेण्याचे तसेच ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ आदींचे अनुदान मिळालेले नाहीत, त्यांची यादी घेऊन तहसीलदारांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.