दोडामार्गातील तहसिलदार रिक्त पदाचा प्रश्न सुटणार
दोडामार्गातील तहसीलदार
रिक्त पदाचा प्रश्न सुटणार
बाबूराव धुरी ः महसूलमंत्र्यांकडून तत्काळ नियुक्तीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः दोडामार्ग तालुक्याचे तहसीलदार पद रिक्त असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी दोडामार्गला तत्काळ तहसीलदार नेमण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
जिल्हाप्रमुख धुरी यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून दोडामार्ग तहसीलदारपद रिक्त असून आणि त्या जागेवर केवळ नायब तहसीलदारांकडूनच तालुक्याचे प्रशासन हाकले जात आहे. यामुळे महसूल कामकाजात विलंब होतोय, तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, दाखले, जमीन नोंदी, तातडीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधल्यावर या परिस्थितीची दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी दोडामार्गला तत्काळ तहसीलदार नेमण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
श्री. धुरी यांनी दोडामार्ग तालुक्याचे महसूल प्रशासन अनेक महिन्यांपासून अपूर्ण क्षमतेने चालू आहे. आम्ही हा प्रश्न सातत्याने मांडत होतो. महसूलमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला, ही स्वागतार्ह बाब आहे, असे सांगितले. दोडामार्ग तहसीलदार नियुक्तीचा निर्णय अमलात आल्यानंतर तालुक्यातील महसूल विभागाचे कामकाज गतीमान होण्यास मदत होईल तसेच शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजातील अडथळे दूर होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.