सिंधुदुर्गनगरीत विधी सेवा केंद्र
84601
सिंधुदुर्गनगरीत विधी सेवा केंद्र
सिंधुदुर्गनगरी ः माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरमाता-पिता व अवलंबित यांच्या न्यायालयीन प्रकरणांकरिता मोफत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे विधी सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपूर्णा गुंड्डेवाडी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती पोवार, आरती देसाई, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, पॅनल विधीज्ञ ॲड. आशपाक शेख, ॲड. रुपेश परुळेकर, विधी स्वयंसेवक पल्लवी जाधव, जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णू ताह्मणेकर आदी उपस्थित होते.
..................
अर्ज सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५००० जणांना संधी मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. यासाठी निपुण, पारंगत भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरेपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.