सावडावमध्ये बारमाही पर्यटन बहरेल

सावडावमध्ये बारमाही पर्यटन बहरेल

Published on

84847

सावडावमध्ये बारमाही पर्यटन बहरेल

खासदार नारायण राणे ः धबधबा सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १७ : सावडाव धबधबा पावसाळ्यानंतरही सुरू राहावा, यासाठी धरणाचे काम सुरू आहे. हे पूर्ण झाल्यानंतर चार महिने चालणारा सावडाव धबधबा पर्यटकांना बारमाही पर्यटन सुरू होईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले. सावडाव धबधबा सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा खासदार राणे, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत झाला.
वर्षा पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या, निसर्गाचा कलाविष्कार असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्याचे सुशोभीकरण करण्यात आले. याचे लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार राणे यांच्या हस्ते स्वागत कमानीवरील फित कापून व फलकाचे अनावरण करून करण्यात आले.
यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रातांधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता विणा पुजारी, उपविभागीय अभियंता कमिलिनी प्रभू, कनिष्ठ अभियंता संजीवनी थोरात, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सावडाव सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे, ग्रामपंचायत अधिकारी मधुरा भुजबळ, पोलिसपाटील अकुंश वारंग, मंडलाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत, ओटव सरपंच रुहिता तांबे, शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, व्यंकटेश वारंग, हेमंत परुळेकर आदी उपस्थित होते. कणकवली एस. एम. हायस्कूलची केतकी काटे हिने दहावीत ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नीलेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.
---
‘नैसर्गिक ठिकाणे टिकविण्याचे प्रयत्न’
खासदार राणे म्हणाले, ‘जिल्ह्यासाठी पर्यटन व्यवसाय आणि पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी आकर्षित करू शकेल, असा सावडाव धबधबा आहे. नैसर्गिक ठिकाणे कशी टिकवता येतील, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. निसर्गसौंदर्य जपत पर्यटनाला नवे आकर्षण देणारा हा उपक्रम सावडाव धबधब्याच्या सौंदर्यात अधिक भर घालणार आहे. यामुळे धबधबा परिसराचे हे नवे रूप इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहित करून पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल.’

Marathi News Esakal
www.esakal.com