सैन्यदलाच्या शौर्याचा देशाला अभिमान
84852
सैन्यदलाच्या शौर्याचा देशाला अभिमान
नीतेश राणे ः कुडाळात हेल्प ग्रुपचा दहीहंडी उत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः हेल्प ग्रुप २१ वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहे. आज दहीहंडीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन सिंदूर’ थीम समोर ठेवून उत्सव आयोजित केला, हे विशेष आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे राष्ट्रीयतेचे प्रतीक आहे. नागरिक म्हणून आपल्या मनामध्ये भारतीयत्वाचा जो भाव आहे, तो ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पूर्ण जगासमोर आला. भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी आपल्या सैनिकांनी केली आणि हे काम पिढ्यानपिढ्या सर्वांमध्ये कोरले जाईल, असा असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज सायंकाळी येथे केले.
हेल्प ग्रुप कुडाळ आयोजित २१ व्या दहीहंडी उत्सवास पालकमंत्री राणे यांनी भेट दिली. यावेळी भाजप जिल्हा प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संध्या तेरसे, अक्षता खटावकर, बंड्या सावंत, मनोज वालावलकर, अभिजित परब, संग्राम सावंत, जीवन बांदेकर, रुपेश कानडे, सचिन काळप, उदय मांजरेकर, गणेश गावडे, बादल चौधरी, दीपक रांजणकर, पप्या तवटे, संजय कोरगावकर, विवेक पंडित, राम राऊळ, जयेश चिंचळकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री राणे यांचे आगमन होताच वाफोली येथील गोविंदा पथकाने सहा थरांची सलामी दिली.
श्री. काळसेकर यांनी, जिल्ह्यात अशा प्रकारचा २१ वर्षे सातत्य ठेवणारा दहीहंडी उत्सव झाला नाही, असे सांगून शुभेच्छा दिल्या. माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तहसीलदार वीरसिंग वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, डॉ. गौरव घुर्ये, अॅड. सुहास सावंत, अॅड. निलांगी रांगणेकर, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाठ आदी उपस्थित होते. विविध सांस्कृतिक व प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम झाले.
--
...म्हणून समाजात एकोपा हवा!
श्री. राणे म्हणाले, ‘‘भारतीय सणांमध्ये दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतो. आज एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवून दहीहंडी फोडतो, यातून हिंदू समाज एकमेकांना ताकद देण्याचा संदेश देतो. हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहिलो तर कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. या सामाजिक उपक्रमात एक पालकमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेहमीच राहीन.’’