स्मार्ट वीज मीटर महायुतीचे पाप

स्मार्ट वीज मीटर महायुतीचे पाप

Published on

85035

स्मार्ट वीज मीटर महायुतीचे पाप

हरी खोबरेकर ः सर्वसामान्यांची लूट होऊनही सत्ताधारी गप्पच

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : प्रीपेड वीज मीटरमुळे तिप्पट, चौपट विजबिले येत असून सर्वसामान्यांची लूट होत आहे. मात्र, याला विरोध दर्शविणारी एकही गोष्ट सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, शिंदे गटाचे आमदार यांच्याकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रीपेड मीटर हे भाजप, शिंदे गटाचे आणि महायुतीच्या सत्तेत असणाऱ्या सर्व घटकांचे हे पाप आहे, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुका संघटक रूपा कुडाळकर, प्रसाद चव्हाण, शाखाप्रमुख गणेश चव्हाण, दीपक देसाई, अक्षय भोसले, सुरेश मडये, नरेश हुले, रवी मिटकर, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यदिनी येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर शहरातील खोत नावाच्या नागरिकाने महावितरणने आपल्याला न विचारता, परवानगी न घेता तसेच कोणतीही तक्रार नसताना वीज मीटर बदलल्याचा आरोप केला. त्यामुळे महावितरणचे हे अधिकारी आमदार, खासदार, पालकमंत्री यांनाच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. सध्या केवळ सरकारी कार्यालयांमधील वीज मीटर बदलण्याचे आदेश आहेत, असे असतानाही सामान्य नागरिकांच्या घरात प्रीपेड मीटर बसवून त्यांची लूट केली जात आहे. प्रीपेड मीटरमुळे विजेचे बिल दुपटी-तिपटीने वाढले आहे. तसेच हे मीटर बसवण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला देण्याची गरजच काय? एकीकडे सरकार ‘बहिणीच्या घरात बहिणीचे पैसे’ म्हणून मदत करतं, आणि दुसरीकडे वीज बिलाच्या माध्यमातून पैसे काढून घ्यायचे असे काम आता शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुढे करून ही लूट सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रीपेड वीज मीटरबाबत भाजप आणि शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आवाज उठवून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहे का?’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सत्ताधाऱ्यांनी केवळ खासगी ठेकेदाराच्या विरोधात घोषणा देऊ नका, तर हा जीआर काढणाऱ्या मंत्र्यांविरोधातही घोषणा द्यावी. भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही हे प्रीपेड मीटर लावण्याचा शासन निर्णय रद्द केला जात नाही. त्यामुळे हा शासन निर्णय आणि संबंधित ठेकेदाराला दिलेले ठेके रद्द करण्याची धमक सरकारने दाखवावी.’’
--------------
लवकरच आंदोलन
या अन्यायाविरोधात लोकांना जागृत करण्यासाठी, शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महावितरणवर जाब विचारण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खोबरेकर यांनी दिला. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर समविचारी घटक सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com