मंडणगड-खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टीने मंडणगडकरांची बोळवण
rat18p11.jpg -
85188
म्हाप्रळ : राष्ट्रीय महामार्गावर म्हाप्रळ ते मंडणगडदरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
------------
खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टीने मंडणगडकरांची बोळवण
म्हाप्रळ-मंडणगड मार्गावर खड्डेच खड्डे; चाकरमान्यांचे होणार हाल, उपोषणकर्त्यांचीही फसगत
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोन प्रमुख राज्यमार्ग, अनेक जिल्हामार्ग व एका राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक जणांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र काही अंतरातील तात्पुरते खड्डे बुजवून मंडणगडवासीयांची बोळवण करण्यात आली. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर खड्डे पडल्याने तालुकावासीयांना रस्त्यावरून वाहतूक करणे त्रासदायक ठरत आहे.
शहर परिसर व तालुक्यातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी खड्डे पडल्याने दोनचाकी व तीनचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. गणेशोत्सवाला मुंबईकर तालुक्यात दाखल होणार असल्याने त्यांचे स्वागत खड्ड्यांनी नको, या भावनेने अनेकांनी प्रशासनास जाग आणण्यासाठी जुलै महिन्यापासून पत्रे, निवेदने दिली; मात्र १६ ऑगस्टला तालुक्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार असल्याने सर्व आंदोलकांना त्यांचे आंदोलन मागे घेण्यास प्रशासनाने भाग पाडले. दौऱ्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव ते मंडणगड या दोन गावांचे हद्दीदरम्यानच्या अंतरात काही प्रमाणात खड्डे बुजवून तालुकावासीयांची बोळवण व उपोषणकर्त्यांची फसगत करण्यात आली. दुर्दैवाने, अतिवृष्टीच्या शक्यतेने दौरा रद्द झाला व गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे बजुवलेल्या खड्ड्यांच्या बाजूला नव्याने खड्डे तयार झाले.
महामार्गावरील चार किलोमीटर अंतरात शिरगाव, मंडणगड या दोन गावांच्या हद्दीत रस्त्याची जुजबी मलमपट्टी करून पूर्ण तालुक्याचे खड्डे बुजवल्याचा आव प्रशासनाने आणला. या दोन गावांच्या हद्दीतही रस्त्यावर पाणी साठते. अशा ठिकाणांचा एकही खड्डा बुजवण्यात आला नाही. प्रवासाने आधीच थकलेल्या मुंबईकरांचा प्रवास आणखी त्रासदायक होणार आहेत.