माजगाव, साटेली तर्फे सातार्डात घरांचे मोठे नुकसान
85588
85589
माजगाव, साटेली तर्फे सातार्डात घरांचे मोठे नुकसान
सावंतवाडी तालुका; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, प्रशासन सतर्क
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः तालुक्यामध्ये चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना कुठलाही धोका उद्भवू नये यासाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, माजगाव (ता.सावंतवाडी) येथील रविकांत भिकाजी मांजरेकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. तर धोंडू बाबली शेंडेकर (रा. साटेली तर्फे सातार्डा) यांच्या राहत्या घराची भिंत पडून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. याची नोंद महसूल दप्तरी झाली आहे.
यावर्षीच्या हंगामात पहिल्यांदाच एवढा पाऊस कोसळला असून संततधार पावसाने नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. परिणामी सखल भागातील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने काही रस्ते पाण्याखाली आल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. तळवडे गावाच्या सीमेवर असलेले होडावडे पुल पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः खोळंबली होती. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. संततधार पावसात अधून मधून सोसाट्याचा वारा वाहत असल्याने काही ठिकाणी छोटी-मोठी झाडे कोसळण्याचे प्रकारही पुढे आले.
तालुक्यातून वाहणारी तेरेखोल नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्क केले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास तेरेखोल नदी धोका पातळी गाठण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने आपत्कालीन विभाग सतर्क झाला आहे. सद्यस्थितीत चार मिलिमीटर एवढी पाणी पातळी तेरेखोल नदीने गाठली असून धोका पातळी ६.२६० आहे. त्यामुळे कधीही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबोली घाट मार्गातही दरडीची कोसळण्याची संभावना लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग विभाग सतर्क आहे. त्यादृष्टीने प्रशासन सतर्क आहे. दुसरीकडे नदीकाठच्या काही भागातील भातशेतीही पाण्याखाली गेली असून ती कुजण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
----------------
विजेच्या लपंडावामुळे गणेश मूर्तीकार त्रस्त
संततधार कोसळणारा पाऊस आणि अधूनमधून सोसाट्याचा वाहणारा वारा यामुळे विजेचा लपंडावही तालुक्यात सुरू आहे. एकीकडे गणेशोत्सव तोंडावर असताना गणेश मूर्ती शाळांमध्ये मूर्तिकारांची मूर्ती घडवण्यामध्ये लगबग सुरू आहे. अशातच विजेच्या लपंडावामुळे त्यांच्या कामांमध्ये व्यत्यय येत आहे. परिणामी महावितरणच्या कारभाराबाबत मूर्तीकारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.