ध्यान गणेशाचे वर्णिता
rat20p8.jpg-
85739
धनंजय चितळे
संतांचे संगती............लोगो
इंट्रो
समर्थ श्री रामदास स्वामींनी दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या दुसऱ्या समासामध्ये मंगलमूर्ती श्री गणेश स्तवन केले आहे. देवसभेमध्ये नृत्य करणारे भगवान श्री गणेश कसे दिसतात, त्याचे अप्रतिम शब्दचित्र त्यांनी रेखाटले आहे. मराठीतील ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी हा समास वाचला आणि त्यातील वर्णनाने प्रभावित होऊन गणराज रंगी नाचतो हे अप्रतिम गीत लिहिले. आता संपूर्ण कोकणात भाद्रपदातील गणेशोत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली आहे म्हणूनच आपणही आज श्रीगणेश चिंतन करूया.
- धनंजय चितळे
-------
ध्यान गणेशाचे वर्णिता
समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकाचा प्रारंभ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। अशा शब्दांत श्रीगणेशस्तुतीने केला आहे. त्यांनी लिहिलेल्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, या आरतीनेच आपल्या आरत्यांची सुरवात होते. श्री समर्थांचा ग्रंथराज दासबोध हा ग्रंथ परमार्थपूरक नेटका प्रपंच कसा करावा, हे शिकवणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पहिल्या समासात ते ग्रंथ लेखनासाठी कोणत्या ग्रंथांचा आधार घेतला आहे, श्री दासबोध ग्रंथाचे स्वरूप काय आहे आणि त्याच्या वाचनाची फलश्रुती काय याची चर्चा करतात. दुसऱ्या समाजातील ओव्यांमधून ते श्री गणरायाचे स्तवन करतात.
ओम नमोजी गणनायका। सर्वसिद्धीफलदायका।
अज्ञानभ्रांतीछेदका। बोधरूपा।।
या पहिल्याच ओवीत ते श्रीगणराय हे अज्ञान आणि भ्रम दूर करणारे तसेच ज्ञान देणारे बोधरूप दैवत आहे, असे सांगून त्या गुणेशाला वंदन करतात. श्रीगणेशांनाही भगवान शंकरांप्रमाणे तीन डोळे आहेत, हेही त्यांनी आरतीत आणि या समासातही सांगितले आहे. देवसभेमध्ये नृत्य करणाऱ्या गणपती बाप्पांचे नर्तन बघताना सारे देव तटस्थ होतात, हेही श्री समर्थांनी या समासात नमूद केले आहे. श्रीगणेशाच्या गंडस्थळातून पाझरणाऱ्या मदामुळे भुंगे आकर्षित झाले आहेत, असे सांगून श्री गणपतींच्या पोटावर नाग बांधला आहे. तो नागही स्वस्थ बसलेला नाही. तोही आपला फणा काढून फुत्कार टाकत आहे. फडके दोंदिचा फणिवर। धुधुकार टाकी।। असे श्री समर्थ म्हणतात. या श्री गणरायांचे ध्यान करण्याचा लाभ सांगताना श्री समर्थ म्हणतात,
ध्यान गणेशाचे वर्णिता। मती प्रकाश होय भ्रांता। गुणानुवाद श्रवण करता। वोळे सरस्वती।।
श्री गणेशध्यानाचे वर्णन इतके महत्वाचे का आहे? आपल्या सर्वच देवातांची रूपवर्णने काही शिकवणारी आहेत. देवांसमोर उभे राहून ती मूर्ती डोळे भरून बघावी आणि मग ती आपल्या आत पाहण्यासाठी डोळे मिटून घ्यावेत. आपण मात्र आधीच डोळे मिटून घेतो! श्री गणेशाची मूर्ती नीट पाहिली तर आपल्या लक्षात येते की, त्यांचे मस्तक हत्तीचे आहे आणि उर्वरित शरीर माणसासारखे आहे. यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही धडा देत असते. आपण ज्ञान मिळवण्यासाठी खूप काही ऐकले पाहिजे; पण त्यातील योग्य-अयोग्य काय आहे याचा निवाडा करून योग्य ते ग्रहण केले पाहिजे. हा बोध श्री गणेशांचे सुपासारखे कान करतात. दोन वस्तू वेगळ्या करण्यासाठी आपण चाळण किंवा सूप वापरतो. चाळणीने जे घेण्यासारखे आहे ते खाली पडते आणि नको ते चाळणीत राहते; पण सुपाने पाखडल्यावर जे नको ते बाहेर पडून जाते आणि हवे ते सुपातच मागे राहते. आपल्या कानांनी असेच ऐकले पाहिजे. दासबोधातच श्रवणभक्तीची व्याख्या करताना श्री समर्थांनी
ऐसे हे उदंड ऐकावे।
असार ते जाणून त्यागावे। असे म्हटले आहे.
दुसऱ्यातील चांगल्या गोष्टी पाहणे किंवा स्वतःतील दोष शोधणे, हे सूक्ष्म नजरेने करावयाचे काम आहे. कारण, दुसऱ्याचे दोष पाहणे आणि आपले ते सारेच बरोबर मांडणे, हा मनुष्यस्वभाव आहे. त्याच्या विपरित करण्यासाठी सूक्ष्मदृष्टी पाहिजे ती दृष्टी श्री गणेशांच्या छोट्या डोळ्यातून सूचित केली आहे. श्री गणेशमूर्ती आणखी काय शिकवते, हे पुढील भागात पाहूया. तोपर्यंत श्री गणेशांना प्रार्थना करूया,
गजमुखा तुझी वाट पाहता। नेत्रशीणले जाण तत्त्वता। भेटशी कधी भ्रमनिवारणा। हे दयानिधे श्री गजानना।।
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।।
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.