रुग्णसेवेसाठी संवेदनशीलता आवश्यक
swt208.jpg
85906
जामसंडेः येथे प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्रः संतोष कुळकर्णी)
रुग्णसेवेसाठी संवेदनशीलता आवश्यक
प्रमोद जठारः जामसंडे नर्सिंग महाविद्यालयात शुभेच्छा समारंभ
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ः परमेश्वराचे देवदूत होण्याचे भाग्य परिचारिकांना मिळते. त्यामुळे शिक्षण घेताना मनातील संवेदना जागृत ठेवून भविष्यात रुग्णांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडे येथे केले. येथे बीएसस्सी नर्सिंग विद्याशाखा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित जामसंडे येथील मुकुंदराव फाटक नर्सिंग महाविद्यालयाच्या चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत आणि २०२२-२३ बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री. जठार बोलत होते. मंचावर ट्रस्टच्या विश्वस्त नीरजा जठार, विश्वस्त मानसी वाळवे, विश्वस्त डॉ. रामदास बोरकर, प्रमुख पाहुण्या मनीषा बिजापूरकर, उर्मिला खारकर, सुनंदा कांबळी, सुधीर दीक्षित, प्रभाकर पवार, प्रा. प्रकाश ढाले, पूजा खोत, डॉ. नम्रता बोरकर, जयंत मणेरीकर, वैशाली मणेरीकर आदी उपस्थित होते.
यावेळी चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांनी मेणबत्या प्रज्वलित करून शपथ घेतली, तर २०२२-२३ बॅचच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. या बॅचकडूनही महाविद्यालयाला भेटवस्तू देण्यात आली. श्री. जठार म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची तुकडी ४० वरून ६० करण्यासाठी प्रयत्न आहेत. बीएसस्सी नर्सिंग विद्या शाखेसाठी परवानगी मिळवण्यासाठीही प्रयत्न आहेत. महाविद्यालय सुरू करून पाच वर्षे झाली. महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी भूखंड घेतला आहे. तेथे महाविद्यालयाबरोबरच वसतिगृह आणि १०० खाटांचे रुग्णालय करण्याचा संकल्प आहे. परिचारिकांना परमेश्वराचे देवदूत होण्याचे भाग्य लाभते. पालकांच्या दृष्टीने पोरगी नुसतीच शिकली नाही तर यामुळे कमावती होते.’’
मनीषा बिजापूरकर यांनी, सेवा करणे सोपे काम नसते. परिस्थिती कितीही बिकट असली तरीही आपले काम प्रामाणिकपणे करायला हवे. परिचारिका रुग्णांची अधिक काळजी घेते. रुग्णसेवा करताना आपोआपच नातेवाईकांचीही सेवा घडते. जीवन जगण्याची खरी प्रेरणा यातून मिळते. यासाठी शिक्षणातील प्रामाणिकपणा अंगिकारला पाहिजे. यातूनच समाजाला पुढे नेता येईल, असे सांगितले.
यावेळी प्राचार्य श्री. ढाले, श्री. दीक्षित यांनी तर विद्यार्थ्यांमधून नम्रता मांडवकर, दामिनी वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरव कदम याचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक उपप्राचार्या पूजा मालप यांनी, सूत्रसंचलन ईशा शिंदे हिने केले. आभार ऋतुजा नाईक हिने मानले.
चौकट
‘अनुभवांचे दवबिंदू’ पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी ईशा शिंदे हिच्या ‘अनुभवांचे दवबिंदू’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच ‘संवेदना’ या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.