आडगावातील शुद्ध गोवंश वेळीच सांभाळायला हवा
बोल बळीराजाचे ..........लोगो
(९ ऑगस्ट टुडे ३)
दहा-पंधरा दिवसंपूर्वी दापोली कृषी विद्यापीठात कोकण कपिला गाईसंदर्भात एक कार्यक्रम आयोजित केला होता. नामशेष होणाऱ्या कोकण गीड्डा संवर्धनासंदर्भात या कार्यक्रमात व्यापक विचारमंथन झालं. प्रत्यक्ष वाड्यात गाईगुरं असणारे कोकणातील किती पशुपालक या कार्यक्रमात होते ते नाही माहीत; पण या निमित्तानं गाईगुरं परवडतच नाहीत, या दृष्टिकोनाला बाजूला सारून कोकणातील पशुधन संगोपनावर चर्चा झाली हेही नसे थोडके..! आता प्रत्यक्षात शुद्ध कोकण गीड्डा कुठे उपलब्ध होतील, हे एकदा जाहीर झालं की हौशी गोपालकांची प्रतीक्षा संपेल आणि सेंद्रिय शेतीलाही संपन्नता येईल.
- rat२२p९.jpg-
25N86263
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
----
आडगावातील शुद्ध गोवंश
वेळीच सांभाळायला हवा
‘धवलक्रांती’नं म्हणे ऐंशीच्या दशकात दुधाचा महापूर आला. आमच्या कोकणात मात्र होस्टन, जर्सी गाई शासनाच्या कृपेने अनुदानावर वाड्यावाड्यात पोचल्या. दुधासारखं पांढरं पाणी की, पांढऱ्या पाण्यासारखं दूध देणाऱ्या या जनावरांनी कोकणातील प्रत्येक गोठ्यात जागा मिळवली. मग सुरू झाली तुलना.. डोंगरदऱ्यात फिरणाऱ्या काटक, चपळ, देशी कोकणी गाई नक्कीच दुधाच्या उत्पादन क्षमतेच्याबाबतीत या विदेशी जनावरांच्या जवळपासही नव्हत्या; पण दुधाचा कस, चव, साय, तूप याबाबतीत कित्येक पटीने उजव्याच होत्या; पण दर्जा, गुणवत्ता आणि संख्यात्मकता एकाच किटलीत कशा मावणार? पण एकदा शासकीय, प्रशासकीय व्यवस्थेनं मनावर घेतलं की, इतकी भलावण आणि इतकं गळी उतरवलं जातं की, भूत-वर्तमान-भविष्य याकडे पाहायचंही माझा बळीराजा विसरून जातो. दिसायला गुटगुटीत या जनावरांनी काही वर्ष कोकणात जणू उच्छाद मांडला. त्यांची पुढची पिढी जशी तयार व्हायला लागली तसा हा भ्रमाचा भोपळा शिमग्याआधीच फुटला. तोपर्यंत अनुदानाच्या पाटाची गंगा कित्येक पदाधिकाऱ्यांचे उखळ दुधापेक्षा पांढरे करून नपुसक समुद्राला मिळाली होती. मग युग आलं कृत्रिम रेतनाचं..! कोणताही संकर हा विजातीय गोष्टीत झाला तरच नवीन पिढी गुणवत्तेने उजवी निघते; पण जर्सीला जर्सी, होस्टनला होस्टन त्याच वंशातलं. जातीचं रेतन किंवा थेट भरवलं तरी पुढची पिढी गुणवत्तेनुसार उजवी कशी निघणार? माणसात सगोत्र नको म्हणतात, ते याचमुळे असावं. या गोंधळात झालं असं की, नवीन खुळी जन्मास आलेली पिढी सर्वच बाबतीत डावी झाली. कोकणात पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या सांभाळलेला शुद्ध गोवंश नासवला गेला आणि हातात ‘दूध आहे की नाही’ हेच माहीत नसलेली पिशवी आली..!!
भारतात त्या त्या प्रदेशात तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, विकसित होत गेलेले गोवंश शेकडो आहेत. ते गुणसुत्रातील विकसित, संवेदनशील मुलभूत नैसर्गिक प्रक्रियेनुसार नुसतेच टिकून आहेत, असे नाही तर अधिक सक्षम होत आले आहेत. कृत्रिम रेतन पूर्णतः चुकीचे असेही नाही; पण माझा बळीराजा त्याकडे तेवढ्या चिकित्सकपणे पाहात नाही, हे वास्तव आहे. माझी गाय, म्हैस कधी माजावर आली आणि कोणत्या बैल, रेड्याला वंश तिच्या उदरात वाढतोय हेही तो लक्षपूर्वक बघत नाही. नोंद तर खूप लांबची गोष्ट.. कोकणातली आपली गाय डोंगरदऱ्यात, ऊनपावसात इथल्या उपलब्ध चाऱ्यावर दूध देते. कोकण कपिला थोडी मेहनत घेतली तर वेळेला अडीच-तीन लिटर दूध नक्की देते. अठ्ठावीस-तीस लिटर दुधात एक किलो तूप होतं. ज्याचा दर अडीच-तीन हजार असतो. दीड वर्षात एक वेत आणि आयुष्यात बारा-चौदा वेते होतात. तिच्या शेणाला दुर्ग॔धी येत नाही. शक्यतो कपिला आजारी पडत नाही. वैद्यकीय खर्च शून्य.. स्वच्छ राहण्याची नैसर्गिक वृत्ती असल्यानं गोचिड होत नाही. बाहेरून पूरक खाद्य लागत नाही, कृत्रिम रेतन लागत नाही. तिच्या पाठीवरून हात फिरवला तर तो तेलकट होतो. कारण, अतिपावसात त्वचा कोरडी राहण्यासाठीची ती नैसर्गिक व्यवस्था आहे. प्रत्येक भूप्रदेशात यासारखी अनेक नैसर्गिक कवचकुंडले घेऊनच सजीव विकसित होत गेला असावा. आपण अतिशहाणपणा करून कोकणात सफरचंद झालीच पाहिजेत, या अट्टाग्रहाची काहीच आवश्यकता नाही. कोकण कपिला आपल्या नैसर्गिक गुणवत्तेनुसार, कोकणातील गरजेइतके दूध उत्पादन करण्यात सक्षम आहे. एक कपिला कुटुंबातील दुधाची गरज भागवते का कोण जाणे? यापेक्षा जास्त दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थांची कोकणी शारीरिक व्यवस्थेला गरजच नसेल? त्या विधात्याच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ करून आपण काटक-सडपातळ कोकणी माणूस तर गमावला नाही ना?
कोणीही कितीही नाकारले तरी शेती आणि पशुपालन ही शेतकऱ्याच्या जीवनाची दोन चाके आहेत. आपण अधिक चाके वाढवून नक्कीच जीवन सुसह्य करू शकतो; पण पंक्चर चाक घेऊन फार अंतर कापणे कठीण आहे. कोकणातील पशुपालनाची शोकांतिका माझ्या बळीराजाला मातीपासून दूर लोटणारी आहे. रासायनिक पदार्थांनी बनवलेले दूध चहाला रंग आणीलही...; पण शेतकऱ्याचे भविष्य काळेकुट्ट करत आहे. अजूनही कुठेतरी आडगावात शुद्ध गोवंश शिल्लक आहे. तो वेळीच सांभाळता आला नाही तर शेतीबरोबरच शेती करणाराही शिल्लक राहणार नाही, हेच खरे वास्तव आहे.
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.