देवबागवासीयांचा विकास हेच ध्येय
swt239.jpg
86540
देवबाग : सरपंच उल्हास तांडेल यांनी अन्य सदस्यांसह जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
देवबागवासीयांचा विकास हेच ध्येय
सरपंच उल्हास तांडेल : कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : आमदार नीलेश राणे यांच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील विकासाला वेग मिळाला आहे. त्यांच्या या विकासकामांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना भुरळ पाडली आहे. देवबाग गावासाठी १५८ कोटी रुपयांचा बंधारा त्यांनी मंजूर केला. गावाच्या विकासासाठीच शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून, पुढील दोन वर्षांत गावाचा कायापालट करण्याचे ध्येय आहे, असे मत देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी व्यक्त केले.
शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली देवबाग येथील ठाकरे गटाचे सरपंच तांडेल व ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तांडेल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सामंत यांनी शिवसेनेत स्वागत केले.
भविष्यात ही संख्या आठपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली असल्याचे तांडेल यांनी सांगितले. आगामी काळात दत्ता सामंत आणि राणे कुटुंबाला अपेक्षित असे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.
तांडेल यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रूपाली मोंडकर, अण्णा केळुसकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, बाळू नाटेकर, मंदार लुडबे, अरुण तोडणकर, अंजना सामंत, नीलेश सामंत, घनःश्याम बिलये, बाळा निकम, काका पेडणेकर, प्रतीक्षा चोपडेकर, दशरथ राऊळ, बाबी कासवकर, ज्ञानेश्वर धुरी, एन्जॉय तुळसकर, मिनीन लुद्रिक उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे मालवणमधील शिवसेनेची ताकद वाढली असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.