पहिल्या टप्प्यातील ''कॅच'' साठी धडपड

पहिल्या टप्प्यातील ''कॅच'' साठी धडपड

Published on

87539
87540

पहिल्या कॅचसाठी मच्छीमारांची झुंज
मासेमारीचा हंगामास पावसामुळे येईना गती; गणेशोत्सवानंतरच सरसकट सुरुवात
संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः राज्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील पावसाळ्यातील मासेमारी बंदी कालावधी संपला आहे. १ ऑगस्टपासून मासेमारी करण्यास मुभा असली तरीही अद्याप पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला नसल्याने सरसकट मासेमारी सुरू झालेली नाही. नारळीपौर्णिमेला सागराला श्रीफळ अर्पण करून किंवा श्री गणेशोत्सव झाल्यानंतरच हंगामाचा मुहूर्त करण्याची सर्वसाधारण प्रथा आहे; मात्र १ ऑगस्टनंतर पावसाचा अंदाज घेत पहिल्या टप्प्यातील मासळीची ''कॅच'' मिळविण्यासाठी मच्छीमारांची धडपड असते.
मेमध्ये मासेमारी हंगाम जोरास असतानाच अचानक १ जूनपासून मासेमारी बंद होते. त्यावेळेपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू होतो; परंतु १ जूनपासून काहीवेळा पाऊस सुरूही झालेला नसतानाही हंगामाच्या अखेरच्या टप्प्यातील ''माशांची कॅच'' मिळवण्याच्या मच्छीमारांच्या आशेला आवर घालावा लागतो. ७ जूनला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाळी हंगाम सुरू होतो, असा पूर्वांपार रिवाज आहे. यापूर्वी अनेक वर्षे या दरम्यानच पावसाचे आगमन होत असल्याचे चित्र असायचे. अलीकडे मात्र वळवाच्या पावसाचे आगमन कधी होईल, याची शाश्‍वती नसते. अलीकडे १ जून ते ३१ जुलै असा शासनाचा मच्छीमारी बंदी कालावधी असतो. १ जूनला मासेमारीसाठी समुद्रात गेलेली नौका बंदरात परतल्यानंतर मासेमारी हंगाम थंडावतो. याच दरम्यान मासळी खरेदी करणारी केंद्रेही बंद होतात. तसेच मासळी लिलावाच्या ठिकाणीही नंतर शुकशुकाट जाणवतो. त्यामुळे बंदी कालावधी सुरू होताच मासेमारी हंगाम ठप्प होतो. यंदा मात्र मेच्या मध्यापासून अवकाळी पावसाने किनारी भागात जोरदार हजेरी लावली आणि त्याला जोडूनच मॉन्सून सक्रिय झाल्याने किमान पंधरा दिवस आधीच मासळी हंगामाचे सूप वाजले. त्यामुळे मच्छीमारांना यंदाच्या हंगामाची आशा लागून राहिली आहे. १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामावरील बंदी उठली. सुरुवातीला जोरदार पाऊस बरसल्यामुळे जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर काहीसा ओसरलेला होता. त्यामुळे काही मच्छीमार मासेमारीला जाण्यासाठी तयारीतच होते. यंदा १ ऑगस्टच्या सुमारास पावसाचे प्रमाण कमी असल्याने वातावरणाचा अंदाज घेत मासेमारी हंगामाचा मुहूर्त झाला. सुरुवातीला काही दिवस चांगली मासळी जाळ्यात सापडली; मात्र अलीकडे काही दिवस किनारी भागात पावसाने पुन्हा जोर धरल्याने समुद्रातील वातावरण खराब झाले. पर्यायाने छोट्या मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले. ट्रॉलर मासेमारीही थंडावली होती. एकवेळ पाऊस चालेल, परंतु समुद्रात वादळसदृश्य स्थिती उपयोगाची नाही, अशी मच्छीमारांची सर्वसाधारण धारणा असते. हंगामाच्या सुरुवातीला बंपर मासळी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे याकाळात सुरुवातीच्या टप्प्यातील ''मासळीची कॅच'' मिळवण्यासाठी धडपड असते; मात्र तरीही निसर्गाची अपेक्षित साथ नसल्यास सहसा धाडस कोणी करीत नाही.
..............................
चौकट
गणेशोत्सवानंतरच खरी सुरुवात
पावसाळी बंदी कालावधी संपून १ ऑगस्टपासून नव्या हंगामाच्या मासेमारीला प्रारंभ होतो. असे असले तरी काहीजण नारळी पौर्णिमेच्या आसपास नौकांची पावसाळी डागडुजी पूर्ण करून चांगला दिवस पाहून मुहूर्त करतात, तर काहीजण गणेशोत्सव झाल्यानंतरच हंगामाची सुरुवात करतात. त्यामुळे १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होत असली तरी श्री गणेश चतुर्थी नंतरच खर्‍या अर्थाने मासेमारीला जाण्याचे नियोजन होते. यंदा मे पासून अवकाळी पाऊस झाला असला तरी काहीवेळा जूनपासून सुरू झालेल्या पावसाचा जुलैमध्ये चांगलाच जोर असतो. अशावेळी बंदी कालावधी संपला तरी सक्षमपणे मासेमारीला सुरुवात होताना दिसत नाही.
.............................
चौकट
बंदी कालावधीची
मुदत एकच
देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर केरळपासून गुजरातपर्यंत १ जून ते ३१ जुलै असाच बंदी कालावधी करण्यात आला आहे. परप्रांतीय नौकांनी आपल्याकडील समुद्रात मासेमारी करताना येथील मच्छीमारांनाही तशी मुभा हवी, म्हणून बंदी कालावधीची मुदत एकच करण्यात आली. नौकांची सुरक्षितता आणि माशांचा प्रजननाचा काळ यादृष्टीने पावसाळी बंदी ठेवण्यात येते; मात्र आपल्याकडे पाऊस असल्याने लवकर बंदी उठूनही अपेक्षित लाभ होत नाही.
................................
swt2718.jpg
87541
विकास कोयंडे
कोट
मासेमारी बंदी कालावधी संपला तरीही अजून मासेमारीला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. सर्वच नौका मच्छीमारीला जात नाहीत. यंदाच्या मासेमारी हंगामाची सुरुवात ''म्हाकूल'' मासळीने झाली. बंदी कालावधीनंतर किरकोळ नौका मच्छीमारीला जात असतानाच मध्यंतरी वादळी पावसाने जोर धरल्याने मासेमारी थंडावली. गणेशोत्सवासाठी मच्छीमार आपापल्या गावी जातात. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच हंगामाला खर्‍या अर्थाने सुरुवात होईल. त्यामुळे मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात येऊनही पावसामुळे त्याचा लाभ उठवता येत नाही.
- विकास कोयंडे, मत्स्य व्यावसायिक, देवगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com