गणेशोत्सव संपत आला तरी खड्डे जैसे थेच
- rat३१p१३.jpg-
२५N८८३४६
रत्नागिरी ः शहरातील जयस्तंभ येथे पडलेले खड्डे वाहनचालकच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही त्रासदायक ठरत आहेत.
----
रत्नागिरीत खड्ड्यांचे महासंकट कायम
गणेशोत्सवातही वाहनचालक, नागरिकांचे हाल; अपघातांची भीती वाढली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : गणेशोत्सव सुरू झाला तरीही रत्नागिरी शहरातील खड्डे जैसे थेच आहेत. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरण झालेले नाही; त्या भागात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्याचबरोबर रामआळी, मारुतीआळी, उद्यमनगर परिसरातही मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली होती. मात्र त्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसाने जांभ्या दगडाने भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. त्या खड्ड्यांत पाणी साचत असून वाहन चालवणे अडचणीचे झाले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील जयस्तंभ येथे खड्डे वारंवार भरले जात असून, पुन्हा तिथे खड्डे पडत आहेत. सकाळी आणि सायंकाळी येथे वाहतूक कोंडी होते. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांना कसरत करावी लागते. काही वेळा वाहन रस्त्याच्या एका बाजूला नेल्यामुळे पादचाऱ्यांची तारांबळ उडते. या गोंधळात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याच खड्ड्यांचा सामना करत मुख्य रस्त्यावरून गणेश आगमनाच्या मिरवणुका पार पडलेल्या आहेत. पाऊस थांबल्यानंतर खड्डे बुजवले जातील, असे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी जांभ्या दगडाच्या साहाय्याने खड्डे भरण्यात आले होते, पण त्यावर पाऊस पडल्यामुळे ते पुन्हा उखडले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाकडून मारुती मंदिराकडे जाताना जिल्हा परिषदेसमोरील रस्त्याची झालेली दुरवस्था दुचाकीचालकांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे. दिवसातून एखादा दुचाकीचालक घसरून पडत आहे. काँक्रीटीकरणासाठी रस्त्यावर टाकलेले डांबर पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे. बारीक खडी आणि वाळू रस्त्यावर विखुरलेली असल्यामुळे, त्यावरून वाहनचालक घसरून पडत आहेत. उखडलेली खडी बाजूला केली असती, तर दुचाकीचालकांची गैरसोय टळली असती, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. मंगळवारी (ता. २) सात दिवसांचे गणपती विसर्जन आहे. तेव्हा तरी हे खड्डे बुजवले जाणार का, असा प्रश्न गणेशभक्तांना पडलेला आहे.
---
कोट १
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून गणेशोत्सवासाठी मार्ग चांगला करावा, अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यादृष्टीने कार्यवाही केली पाहिजे. गणेश आगमन झालेले आहे. आता विसर्जनापर्यंत मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवले, तर लोकांचा त्रास कमी होईल.
– छोटू खामकर, रत्नागिरी
---
कोट २
शहरातील खड्डे बुजवावेत, यासाठी वारंवार पालिकेकडे मागणी केली होती. परंतु त्यात पालिका प्रशासन यशस्वी ठरलेले नाही. शहरातील काँक्रिटीकरण वेळेत झाले असते, तर ही वेळ किमान मुख्य रस्त्यावर आली नसती. मात्र, पालिकेकडून हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
– प्रसाद सावंत, शहर संघटक, ठाकरे शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.