महिला सक्षमीकरणावर आंतरराष्ट्रीय परिषद
महिला सक्षमीकरणावर आंतरराष्ट्रीय परिषद
गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन; अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युकेतील तज्ज्ञांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन १२ सप्टेंबरला लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी डॉ. लीना बावडेकर यांचे बीजभाषण होणार आहे. परिषदेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्यावतीने १२ आणि १३ सप्टेंबर रोजी ही परिषद व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह येथे होणार आहे. या परिषदेत अमेरिकेतील अटलांटाचे महापौर आंद्रे डिकन्स, ऑस्ट्रेलियामधील वरिष्ठ विज्ञान संशोधिका लॉराविल्यम्स, यूकेस्थित ब्रिर्गिटजलाव आदी मान्यवर साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. देश-विदेशातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सामूहिक गटचर्चेत सहभागी होणार आहेत. संशोधक महिलांविषयक विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत. विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान, स्त्रीशिक्षण, समानता, त्यांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम-उषा महाविद्यालयीन समन्वयक व शास्त्र शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम आणि अन्य आयोजक सदस्य परिश्रम घेत आहेत. ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात होणार आहे.
चौकट १
पीएम उषाअंतर्गत अनुदान
मार्च २०२४ मध्ये भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत महाविद्यालयाला पाच कोटी रुपयांचे प्रकल्प अनुदान मंजूर झाले. या अनुदानांतर्गत भविष्यात हेरिटेज दर्जा असलेल्या मुख्य वास्तूचे पुनर्नूतनीकरण, नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. याच योजनेंतर्गत महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्ग, विविध कार्यशाळा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.