घरोघरी आरत्या, भजनांच्या मंजूळ स्वर

घरोघरी आरत्या, भजनांच्या मंजूळ स्वर

Published on

घरोघरी आरत्या, भजनांच्या मंजूळ स्वर
गावे गजबजली; अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश आराधना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमान्यांमुळे गावातील घरे गजबजली आहेत. घरोघरी आरती, भजनांचे मंजूळ स्वर कानी पडत आहेत. सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. आज गौरी-गणपती विसर्जन होणार असले तरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश आराधना करण्यात येणार आहे. त्यानंतर गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.
गणेश चतुर्थीपासून सर्वत्र मंजूळ सामूहिक आरत्यांचे स्वर ऐकू येऊ लागले आहेत. सायंकाळी गणेशाची संगीत आरती करण्यासाठी प्रत्येक वाडीमध्ये गणेशभक्त फिरत आहेत. प्रत्येक घरी नियमित पाच आरत्या म्हणण्यासाठी भाविक जातात. ही प्रथा अनेक गावात पहायला मिळते. कोकणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी लाखो संख्येने दाखल होतात. आरती चुकवायची नाही, असा नेम सर्वजण करतात. यामुळे गावची एकीसुद्धा जपली जाते.
अनेक गावांमध्ये ढोलकी, पखवाज सोबत हार्मोनिअम आणि टाळांचा गजर अशा संगीत आरत्यांची परंपरा जपली जाते. संगीत आरतीमुळे गणरायाच्या आराधनेत अधिक गोडवा येतो. प्रत्येक आरती सुरेख चालीत, लयीत म्हणण्याची मजा काही औरच आहे. झांजा, टाळ व चकवा यांच्या लयबद्ध साथीमुळे नाद निर्माण होतो व या आरत्या श्रवणीय होतात. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप शहरी भागात जास्त असले, तरी कोकणातील खेडोपाड्यात घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या सणानिमित्त बाहेर गावी असलेले कोकणवासीय एकत्र येतात. एकत्र कुटुंबांचा उत्सव एकाच घरात साजरा होतो.
रात्रीच्या वेळी आबालवृद्ध या आरत्यांसाठी घरोघर फिरतात. जशी आपल्या घरातील पूजा व आरती होईल, तसा प्रत्येक जण या गटात सहभागी होतो. टाळ, मृदुंग, ढोलकी, झांजा घेऊन आरतीसाठी तयारी केली जाते. गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक दिवशीच्या रात्री हा उपक्रम सुरू असल्याने प्रत्येक घरात प्रसादाचे वाटपही होते.

चौकट
जाकडी, टिपरी नृत्याने रंगत
गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणातील लोककला असलेल्या टिपरी व जाखडी नृत्याचेही कार्यक्रम रंगत आहेत. गणपती म्हणजे कलेची देवता आहे. त्यामुळे या सर्व लोककलांचा प्रारंभ गणेशोत्सवातच केला जातो. याकरिता लागणारा सरावही हे कलाकार करत असतात. या कलाकारांना मागणीही भरपूर असल्याने प्रत्येक गावात हे कलाकार मंडळी सुपारी घेतात आणि आपली कला सादर करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com